आरटीई प्रवेशाकडे पालकांची पाठ, औरंगाबाद जिल्ह्यात ५०९८ पैकी ११९९ जागा रिक्त

संदीप लांडगे
Sunday, 29 November 2020

कोरोनाचा फटका आरटीई प्रवेश प्रक्रियेलाही बसला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आरटीईअंतर्गत ५८४ शाळांमध्ये ५ हजार ९८ जागांसाठी लॉटरी काढण्यात आली होती.

औरंगाबाद : कोरोनाचा फटका आरटीई प्रवेश प्रक्रियेलाही बसला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आरटीईअंतर्गत ५८४ शाळांमध्ये ५ हजार ९८ जागांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. त्यापैकी ३ हजार ८९९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून १ हजार १९९ जागा रिक्त राहिल्या आहे. पहिल्या फेरीतील प्रवेश प्रक्रियेत अडीच ते तीन हजार प्रवेश झाले. ज्यांचे नाव प्रतीक्षा यादीत (दुसऱ्या फेरीत) होते.

त्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. प्रतीक्षा यादीत प्रवेशासाठी १ हजार ५४९ जणांची निवड झाली होती. त्यापैकी केवळ ४१२ जणांनीच प्रवेश निश्चित केले. ज्यांचे पहिल्या आणि दुसऱ्या यादीत नाव आले नव्हते, अशांना दिलासा देणारी बाब म्हणजे तिसरी प्रवेश फेरी घेण्यात आली. त्यात ४८९ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली आहे. त्यापैकी ७७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शनिवारपर्यंतची मुदत देण्यात आली होती.शाळांना विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करुन सोमवारपर्यंत (ता.३०) प्रवेश निश्‍चिती करायची आहे.

आरटीई प्रवेशाची स्थिती
एकुण शाळा - ५८४
प्रवेश क्षमता - ५ हजार ९८
आतापर्यंत झालेले प्रवेश - ३ हजार ८९९
रिक्त जागा - १ हजार १९९

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Affects RTE Admission Aurangabad News