
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत आठवडाभरापासून घट होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
औरंगाबाद : भरमसाट वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येत आठवडाभरापासून जिल्ह्यात घट होत असल्याचे स्पष्ट होत आहे. तर दुसरीकडे उपचाराने बरे होणाऱ्यांचे प्रमाणही दिलासादायक आहे. आठवडाभरापूर्वी ३०० ते ४०० एवढी होती, ती आता गेल्या पाच दिवसांत दररोज पावणेदोनशे ते अडीचशेदरम्यान आली आहे. तर शहरातील कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८३.५८१ टक्के एवढे आहे. जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. एप्रिलमध्ये रुग्णवाढीचे प्रमाण कमी होते; मात्र पुढे मे महिन्यात रुग्णांची संख्या वाढू लागली. जून आणि जुलै महिन्यात तर रुग्णवाढीचा उद्रेक झाला होता.
Corona Update : औरंगाबादेत नवे १९३ कोरोनाबाधित, उपचारानंतर जिल्ह्यातील चारशे...
वाढत्या संख्येला ब्रेक
ऑगस्ट महिन्यात रोजचे ३०० ते ४०० अशी रुग्णांची संख्या वाढू लागली. त्यामुळे प्रशासन चिंतेत होते. दरम्यान, सिरो सर्वेक्षणाच्या अहवालातून तर शहरात कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे जिल्ह्यात विशेषतः शहरात कोरोनाच्या रुग्णवाढीचा उद्रेक आणखी वाढतो की काय? अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र महापालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे रुग्णांच्या वाढत्या संख्येला ब्रेक लागल्याचे आता मानले जाऊ लागले आहे.
चाचण्यांची मोहीम
महापालिकेने अँटीजेन व आरटीपीसीआर चाचण्याची मोठी मोहीम राबविली. बाजारपेठा खुल्या करताना व्यापारी व व्रिकेत्यांची कोरोना चाचणीची सक्ती केली. यातून अनेक व्यापारी व विक्रेते कोरोना पॉझिटिव्ह निघाले. आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी लॉकडाउन खुला करताना व्यापारी व विक्रेत्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला नसता तर कदाचित रुग्णवाढीचा वेग अधिकच वाढला असता.
भाज्यापाल्यांनी खाल्ला ‘भाव’; सर्वसामान्यांच्या खिशाला झळ, आवक घटल्याचा परिणाम
पाच दिवसांत दोन हजारांवर बरे
मागील पाच दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या घटली आहे. गेल्या पाच दिवसांत १,०३१ रुग्णांची जिल्ह्यात वाढ झाली. तर दुसरीकडे २,१३३ कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. विशेष बाब म्हणजे ३० सप्टेंबर रोजी कोरोनामुक्त झालेल्या तब्बल ८७६ रुग्णांना सुटी देण्यात आली. या दिवशी जिल्ह्यात एकूण २३७ रुग्णांची वाढ झाल्याची नोंद आहे.
संपादन - गणेश पिटेकर