esakal | हातावर शिक्का असलेला पाहुना आला अन् उडाला गोंधळ
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad City news

पुण्यात होम क्वारंटाईन केलेला कोरोना संशयित थेट औरंगाबादेत पाहुणा बनून आला. घरातील महिलेच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यानंतर या पाहुण्याने काढता पाय घेतला मात्र संपर्क कुटुंबाला तपासणीसाठी रुग्णालयात जावे लागले. 

हातावर शिक्का असलेला पाहुना आला अन् उडाला गोंधळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सावधगिरी बाळगा. घरातून बाहेर पडू नका, शंका आल्यास तातडीने हेल्पलाईनवर संपर्क साधा, होम क्वारंटाईन असल्यास घरातून बाहेर पडू नका, असे आवाहन शासनातर्फे वारंवार केले जात आहे. मात्र शासनाच्या आवाहनाला केराची टोपली दाखविली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. पुण्यात होम क्वारंटाईन केलेला कोरोना संशयित थेट औरंगाबादेत पाहुणा बनून आला. घरातील महिलेच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यानंतर या पाहुण्याने काढता पाय घेतला मात्र संपर्क कुटुंबाला तपासणीसाठी रुग्णालयात जावे लागले. 

कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातारण आहे. मात्र नागरिकांनी भीती न बाळगता काळजी घ्यावी, गरज असेल तरच घरातून बाहेर पडा, असे आवाहन राज्य सरकारतर्फे वारंवार केले जात आहे. त्यानंतर नागरिक घरी थांबत नसल्याने अखेर राज्य शासनाने सोमवारी (ता. २३) रात्रीपासून संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. शासनस्तरावर एवढी खबरदारी घेतली जात असताना नागरिकांना मात्र गांभीर्य राहिलेले नाही. होम क्वारंटाईन केलेला एक जण चक्क पुण्याहून औरंगाबादच्या राजनगरात आल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी उघडकीस आला. 

  हे ही वाचा...   अडगळीच्या वर्गखोलीत सापडली  रसायनशास्त्राची प्रश्‍नपत्रिका!  

या वॉर्डाच्या नगरसेविका अनिता साळवे यांचे पती मोहन साळवे यांनी याविषयी सांगितले की, राज नगर भागातील श्री. काकडे यांच्या घरी सोमवारी सायंकाळी पुण्याहून पाहुणा आला होता. घरातील मंडळींनी या पाहुण्यांचे स्वागत केले. तासाभरानंतर पाहुण्यासाठी जेवणही तयार करण्यात आले. घरातील महिला जेवण वाढत असताना त्यांची नजर या पाहुण्याच्या हातावरील असलेल्या शिक्क्यावर पडली. हा शिक्का कोरोनामुळे होम क्वारंटाइन करण्यात आल्याचा असल्याचे महिलेच्या लक्षात आले व कुटुंबाला मोठा धक्का बसला. 

...आणि महिला रडायला लागली 
सर्वप्रथम ज्या महिलेच्या हा प्रकार लक्षात आला ती तर रडायला लागली. त्यावर घरातील इतरांनी चौकशी केली असता, या महिलेने पाहुणा कोरोना संशयित असल्याचे आणि त्याच्या हातावर तसा शिक्का असल्याचे सांगितले. दरम्यान ही बाब पाहुण्यांच्या लक्षात येताच त्याने तिथून काढता पाय घेतला. थोड्या वेळानंतर ही चर्चा गल्लीतही इतरांना समजली. दरम्यान मंगळवारी सकाळी या घरातील चार सदस्यांना तपासणीसाठी घाटी रुग्णालयात नेण्यात आल्याचे श्री. साळवे यांनी सांगितले.

वाचा...  विनाअनुदान शाळांना मिळणार अनुदान  

go to top