अडगळीच्या वर्गखोलीत सापडली  रसायनशास्त्राची प्रश्‍नपत्रिका! 

Aurangabad -  HSC Board exam Chemistry questionnaire found in the Open room
Aurangabad - HSC Board exam Chemistry questionnaire found in the Open room

औरंगाबाद ः बारावीच्या परीक्षेतील आणखी एक गैरप्रकार उघड झाला आहे. शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सुंदरवाडी येथील एका परीक्षा केंद्रात एका पडक्या वर्गखोलीत कॉपी पुरविण्यासाठी रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका घेऊन उत्तरे लिहिण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागास मिळाली होती. त्यावर भरारी पथकाने सकाळी साडेअकराला केंद्रावर अचानक भेट दिली असता, केंद्राचे गेट उशिरा उघडण्यात आले. 

तोपर्यंत कॉपी करणारी व्यक्ती फरारी झाली होती. यासंदर्भात कामात बेजबाबदारपणा केल्याप्रकरणी केंद्रसंचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, प्रश्नपत्रिका वेगळ्या खोलीत आली कशी? असा प्रश्न निर्माण होत आहे. आठवडाभरात विभागात झालेल्या या तिसऱ्या घटनेमुळे शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे.

सुंदरवाडी येथील शिवछत्रपती कनिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होत असल्याची गुप्त माहिती पोलिस यंत्रणेला मिळाली होती. याबाबत पोलिस अधीक्षक यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना देऊन संयुक्त कारवाई करण्यासाठी सापळा रचला होता. बुधवारी (ता. २६) सकाळच्या सत्रात या केंद्रावर रसायनशास्त्राचा पेपर सुरू झाला. त्यानंतर एक तासाने शिक्षण विभागाच्या भरारी पथक व पोलिसांचे पथक केंद्रावर हजर झाले; परंतु केंद्राचे गेट उघडण्यास तब्बल दहा मिनिटे वेळ घेण्यात आला.

 केंद्रातील तपासणीत आठ ते दहा कॉपीबहाद्दरांवर कार्यवाही करण्यात आली. केंद्राच्या इमारतीच्या बाजूला असलेल्या एका छोट्या पडक्या खोलीत गैरप्रकार सुरू होता. त्या ठिकाणाहून उत्तरे लिहून केंद्राला पुरविली जात होती. मात्र, भरारी पथकाची चाहूल लागताच तेथील अज्ञात व्यक्ती त्या खोलीतून फरारी झाला. पोलिस पथकाने या खोलीची तपासणी केली असता तेथे रसायनशास्त्राची प्रश्‍नपत्रिका, पाच नवनीत गाईड, कोरे कागद, पाण्याची बॉटल असे साहित्य आढळून आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. 

प्रश्‍नपत्रिका या खोलीत 
आलीच कशी?
 
प्रत्येक परीक्षा केंद्रावर जेवढे विद्यार्थी परीक्षेला बसलेले असतात तेव्हढ्याच प्रश्‍नपत्रिका, उत्तरपत्रिका बोर्डाकडून पाठविल्या जातात. त्यानंतर परीक्षेला गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांच्या उरलेल्या प्रश्‍नपत्रिका संभाळण्याची जबाबदारी केंद्रसंचालकाची असते. असे असताना एका बेवारस खोलीत प्रश्‍नपत्रिका आलीच कशी? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दरम्यान, परीक्षा केंद्रावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे वायर तोडून टाकण्यात आलेले होते. 

केंद्र, केंद्रसंचालकाकडून 
कॉपीला खतपाणी 

कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी बोर्डाकडून दरवर्षी भरारी पथके स्थापन केली आहेत. एकीकडे कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न होत असताना केंद्रसंचालक, पर्यवेक्षकांकडून या प्रकाराला खतपाणी घालण्याचा प्रकार सुरू आहे. औरंगाबाद विभागात बारावीच्या परीक्षेदरम्यान आतापर्यंत पाच ते सहा मोठे गैरप्रकाराची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामध्ये शिक्षक, केंद्रसंचालक, पर्यवेक्षक दोषी आढळले आहेत. अशा प्रकारामुळे शिक्षणक्षेत्रालाच काळिमा फासला जात आहे. 

परत होम सेंटर 
परीक्षेत गैरप्रकार होऊ नये, यासाठी केंद्रातील विद्यार्थ्यांना होम सेंटर देण्यात येणार नाही. असा गाजावाजा परीक्षेपूर्वी करण्यात आला होता. मात्र, असे असताना गंगापूर तालुक्यतील रांजणगाव शेणपुंजी येथील परीक्षा केंद्रावर शिक्षक पेपर सोडवीत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. हे प्रकरण ताजे असताना पुन्हा बोर्डानेच दिलेले होम सेंटर सुंदरवाडीत असा प्रकार घडला आहे. 
 

सुंदरवाडी येथे झालेला प्रकार धक्कादायक असून, याची संपूर्ण माहिती माध्यमिक शिक्षण विभागाच्या अहवालानंतर राज्य मंडळास पाठविण्यात येईल. तदर्थ समितीसमोर प्रकरण मांडण्यात येईल. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. केंद्रसंचालकांवर कामात बेजबाबदारपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. 
सुगता पुन्ने, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ 
 
माध्यमिक शिक्षण विभागाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी अभियान राबविले; पण तरी अशा प्रकारे गैरप्रकार केले जात आहेत. कोणत्याही चुकीच्या गोष्टींचे समर्थ केले जाणार नाही. कडक कारवाई करण्यात येईल. केंद्रसंचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली असून, पाच गाईड वर्गात सापडले आहेत. 
बी. बी. चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com