esakal | Corona : शहरातील हे दहा वॉर्ड ‘रेड झोन’मध्ये 
sakal

बोलून बातमी शोधा

Corona News Aurangabad

शहरातील ११५ पैकी १०५ वॉर्डांत कोरोनाचे रुग्ण आढळलेले नाहीत. त्यामुळे ज्या दहा वॉर्डांत कोरोना रुग्ण आढऴून आले त्या ठिकाणी महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. टप्प्याटप्प्याने क्वारंटाइन कक्षाची क्षमता वाढविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. 

Corona : शहरातील हे दहा वॉर्ड ‘रेड झोन’मध्ये 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली, तरी ही साथ फक्त दहा वॉर्डांपुरती मर्यादित आहे. अद्याप १०५ वॉर्डांत कोरोनाचे रुग्ण आढळलेले नाहीत. त्यामुळे दहा वॉर्डांवर महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. टप्प्याटप्प्याने क्वारंटाइन कक्षाची क्षमता वाढविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. 

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेने सुमारे चार हजार लोकांना क्वारंटाइन करता येईल एवढी व्यवस्था केलेली आहे. त्यानुसार पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून त्यांना क्वारंटाइन केले जात आहे. त्यासाठी टास्क फोर्स नियुक्त करण्यात आली आहे.

जास्तीत जास्त लोकांना शोधून त्यांच्या चाचण्या महापालिका करीत असल्याचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १२८ वर गेली असली तरीही कोरोनाचा संसर्ग संपूर्ण शहरात नाही. तो केवळ दहा वॉर्डांतच आहे. उर्वरित भागात कोरोनाचे रुग्ण नाहीत. त्यामुळे रेड झोन बनलेल्या याच भागावर प्रशासनाने फोकस केले आहे, असे प्रशासक पांडेय यांनी सांगितले. 

या वॉर्डांमध्ये संक्रमण 
आरेफ कॉलनी, आसेफिया कॉलनी, टाऊन हॉल नूर कॉलनी, किलेअर्क, भीमनगर, समतानगर, बायजीपुरा, किराडपुरा, संजयनगर मुकुंदवाडी, पैठणगेट. 
 
वृद्धांची करणार तपासणी 
कोरोनाचा धोका वृद्धांना जास्त आहे. त्यामुळे या दहा वॉर्डांतील वृद्ध नागरिकांचा शोध घेऊन त्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. त्यात मधुमेह, हृदयविकार, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण, हायपरटेन्शन असलेल्या ज्येष्ठांचा समावेश असेल, असे प्रशासक पांडेय यांनी सांगितले. 

गरुदत्तनगरचे कनेक्शन मिळेना 
गारखेडा परिसरातील गुरुदत्तनगरातील वाहनचालक कोरोनाबाधित निघाला आहे. त्यानंतर महापालिकेने तातडीने गुरुदत्तनगरचा भाग सील करून त्याची पत्नी व मुलाला ताब्यात घेऊन क्वारंटाइन करण्यात केले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा जोगदंड यांनी बुधवारी (ता. २९) दिली. 
या परिसरात जंतुनाशकाची फवारणी करण्यात आली; तसेच शेजारच्या नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी गुरुवारी (ता. ३०) आरोग्य पथक या भागात जाणार असल्याचे डॉ. जोगदंड यांनी सांगितले. मात्र या चालकाला कोरोनाची लागण कुठून झाली याचा शोध महापालिका प्रशासन घेत आहे. 

फळ मार्केटही आता बंद 
लॉकडाउनची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, त्यामुळे फळे-भाजीपाला मार्केटची वेळ सकाळी अकरा वाजेपर्यंतच राहणार आहे. रमजानमुळे मुस्लिम बांधवांना फळांची खरेदी करणे सोयीचे व्हावे यासाठी महापालिका, जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाने एकत्रितपणे येऊन शहरातील २३ जागा निवडल्या होत्या. या जागांवर दुपारी तीन ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत फळांची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र फळांच्या खरेदीच्या निमित्ताने नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे बुधवारपासून फ्रुट मार्केट बंद करण्यात आले आहेत.