फटाके विक्रेते, बाजारासह जीममध्ये होणार कोरोना चाचण्या; सणासुदीत संसर्ग टाळण्यासाठी औरंगाबाद महापालिकेचा पुढाकार

20navi_20mumbai_6_1
20navi_20mumbai_6_1

औरंगाबाद : दिवाळीमुळे बाजारपेठेत गर्दी वाढण्याची शक्यता असून, या गर्दीत कोरोना संसर्गाचा धोका आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने फटाका विक्रेते, आठवडे बाजार व जीममध्ये आरटीपीसीआर चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना संसर्गाच्या दहशतीनंतर आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मिशन बिगीन-अगेनअंतर्गत जीम, आठवडे बाजार सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दी वाढली आहे. त्यात दिवाळीचा जण तोंडावर आला आहे. म्हणून गर्दी आणखी वाढणार आहे.

या गर्दीतून संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती आहे. त्यामुळे महापालिकेने कोरोना चाचण्या वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. जीमचालक आणि त्यांचे कर्मचारी अशा पंधरा जणांची चाचणी आतापर्यंत करण्यात आली आहे. या चाचण्या आरटीपीसीआर पद्धतीच्या आहेत. चाचण्या झाल्याचे प्रमाणपत्र संबंधिताला दिले जात आहे.

आठवडे बाजारमध्ये चाचणीसाठी पथक नियुक्त केले जाणार आहे. जाफरगेट येथे रविवारी, शहानूरवाडी येथे सोमवारी, चिकलठाणा येथे शुक्रवारी तर आणि छावणी येथे गुरुवारी बाजार भरतो. ज्या दिवशी बाजार भरवला जातो, त्या दिवशी दिवसभर महापालिकेचे पथक बाजाराच्या ठिकाणी असेल. बाजारातील दुकानदारांची चाचणी केली जाईल, बाजारात येणाऱ्या ग्राहकांची इच्छा असेल तर त्यांचीदेखील कोरोना चाचणी केली जाईल असे पाडळकर यांनी सांगितले.

लो ट्रान्समिशन काळ; सावधानता बाळगा

शहरात सध्या कोरोनाचा लो ट्रान्समिशन काळ सुरू झाला आहे. आता नागरिकांनी अधिक सावधानतेने वागले पाहिजे. विषाणूसाठी पुढील शरीरच मिळाले नाही तर त्याचा फैलावदेखील होणार नाही, यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर कटाक्षाने केला पाहिजे, त्याचबरोबर सुरक्षित अंतर राखण्याच्या दृष्टीने देखील जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे; तसेच हिवाळ्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवली पाहिजे, असे पाडळकर म्हणाल्या.

रुग्णांचा आकडा १००५ वर

मंगळवारी शहरात उपचारासाठी दाखल असलेल्या एकूण रुग्णांची संख्या ११२३ होती. त्यांपैकी महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या १००५, ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या ८०, इतर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ३८ आहे. ११२ रुग्ण आयसीयूमध्ये दाखल असून, १५४ जणांना ऑक्सिजन देण्यात आला आहे. ८०८ रुग्ण आयसोलेटेड वॉर्डमध्ये आहेत, असे पाडळकर यांनी नमूद केले.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com