कोरोनाचा अहवाल येईपर्यंत हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का, औरंगाबादेत चार लाख चाचण्या

माधव इतबारे
Tuesday, 23 February 2021

महापालिकेने तापडीया मैदान, रिलायन्स मॉल गारखेडा परिसर, सिडको एन-२ कम्युनिटी सेंटर, एन-८, एन-११, छावणी परिषदेचे हॉस्पिटल, राजनगर याठिकाणी चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

औरंगाबाद : कोरोनाचा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासन पुन्हा एकदा सज्ज झाले असून, चाचण्यांची संख्या वाढविण्यासोबतच ज्यांचे स्वॅब घेऊन तपासणीला पाठविले आहेत. त्यांना अहवाल येईपर्यंत हातावर शिक्का मारून होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून दोन लाख ५० हजार ॲन्टीजेन पद्धतीच्या तर एक लाख ५० हजार आरटीपीसीआर पद्धतीच्या चाचण्या केल्या असल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नीता पाडळकर यांनी सांगितले.

वाचा - कोरोना काळात औरंगाबादचे राजकारणी इतके बेफिकीर कसे? ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग; नियम काय जनतेनेच पाळायचे का ?

कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी महापालिकेने केलेल्या तयारी संदर्भात डॉ.पाडळकर यांनी सांगितले की, पुन्हा किलेअर्क व एमजीएम स्पोर्टस् कॉम्प्लेक्स येथील कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. त्यासोबतच ज्या कोविड सेंटरच्या जागा महापालिकेने परत केल्या आहेत. त्यांना देखील पुन्हा पत्र दिले जाणार आहे. सुमारे ३०० कर्मचारी अद्याप कार्यरत आहेत.

वाचा - स्वप्नं पापण्यातले पापण्यातच विरले, कुटुंबाचा आधार होऊ पाहणाऱ्या जिद्दी प्रतिक्षाला काळाने अडविलेच

३९ हजार ॲन्टीजेन तर ११ हजार आरटीपीसीआर किट महापालिकेकडे उपलब्ध आहेत. गरज पडल्यास शासनाकडून कीट प्राप्त होतील. मंगल कार्यालयांसह, सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी ५० च्यावर गर्दी असू नये, असा नियम असून, नियमाचे उल्लंघन करणाऱ्याच्या विरोधात कारवाई करण्याची सूचना करण्यात आली आहे.

रेमडेसिव्हर इंजेक्शन घेणार
महापालिकेकडे सध्या ५० रेमडेसिव्हर इंजेक्शन उपलब्ध आहेत. घाटी रुग्णालयातून आणखी एक हजार इंजेक्शन मागविले जाणार आहेत. अतिगंभीर रुग्णांसाठी रेडिमिसिव्हर इंजेक्शनची गरज आहे.

वाचा - एकादशीनिमित्त उद्या नाथ मंदिर राहणार एक दिवस बंद, कोरोनामुळे प्रशासनाचा निर्णय

चार ठिकाणी २४ तास चाचणी
महापालिकेने तापडीया मैदान, रिलायन्स मॉल गारखेडा परिसर, सिडको एन-२ कम्युनिटी सेंटर, एन-८, एन-११, छावणी परिषदेचे हॉस्पिटल, राजनगर याठिकाणी चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच विमानतळ, बसस्थानकावर पथक तैनात आहे. जाधववाडी भाजी मंडई येथे दररोज तपासणी केली जात आहे. दोन मोबाईल टीम तैनात आहेत. मेल्‍ट्रॉन कोविड केअर सेंटर, एमजीएम स्पोर्ट कॉम्प्लेक्स, किलेअर्क व पदमुरा येथे चोवीस तास चाचण्यांची सुविधा असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Before Corona Test Report Home Quarantine Stamp On Hand Aurangabad News