esakal | मी कोरोना पाॅझिटीव्ह होतो पण लक्षणे जाणवली नाही
sakal

बोलून बातमी शोधा

मी कोरोना पाॅझिटीव्ह होतो पण लक्षणे जाणवली नाही

किराडपुरा येथील २२ वर्षीय तरुण उपचारा नंतर झाला कोरोना मुक्त

मी कोरोना पाॅझिटीव्ह होतो पण लक्षणे जाणवली नाही

sakal_logo
By
शेखलाल शेख


औरंगाबाद : ‘‘माझ्यात कोरोनाची कोणतीच लक्षणे जाणवली नाही. मात्र, जेव्हा माझी चाचणी झाली तेव्हा माझा अहवाल पॉझिटीव्ह आला. उपचारादरम्यान मी सकारात्मक राहिलो. डॉक्टरांनी दिलेल्या औषधी घेतल्या. त्यातून मी बारा दिवसांत बरा झालो’’, असे कोरोनामुक्त झालेल्या किराडपुरा येथील २२ वर्षीय तरुणाने सांगितले. 

कोरोनामुक्त झालेला तरुण म्हणाला, ‘‘मी औरंगाबाद शहरातील एका इंजिनिअरिंग महाविद्यालयात मॅकेनिकल इंजनिअरिंगच्या तृतीय वर्षात आहे. आरेफ कॉलनीत माझे आजोबा (नाना) राहतात. माझे वडील माझ्या मामाच्या घरी गेले होते. आरेफ कॉलनीत रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्यानंतर माझ्या ५५ वर्षीय वडिलांची आणि आमची तपासणी करण्यात आली. यामध्ये माझे वडील आणि मी पॉझिटीव्ह आलो. आईचा अहवाला निगेटीव्ह आला. माझ्या वडिलांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने मी खूप चिंतेत होतो. अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर आम्हाला चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

येथे असताना डॉक्टरांनी आमची खूपच काळजी घेतली. सकाळी आणि रात्रीच्या वेळेस आम्हाला गोळ्या दिल्या जात होत्या. माझ्यात फारशी लक्षणे नव्हती. फक्त दोन दिवस थोडा खोकला आला. पण, तोही गोळ्या घेतल्यानंतर बरा झाला. रक्ताचे नमुने, ईसीजी काढण्यात आले. सकाळी नाश्‍तात पोहे, उपमा दिला जात होता.

हेही वाचा- अर्धा दिवस नागरीकांची झुंबड पण....

जेवणात अतिशय चांगल्या प्रतीची थाळी होती. मला उपचारादरम्यान कोणताच त्रास झाला नाही. मी सरकारात्मक राहिलो. डॉक्टरांनी जसे सांगितले त्याप्रमाणे दीर्घ श्‍वास घेण्याचा व्यायाम केला. रुग्णालया असताना आम्हाला व्यैयक्तिक रूम दिली, स्वतंत्र डस्टबीन, पर्सनल सॅनिटायझर देण्यात आले. डॉक्टर दिवसभरातून दोनदा तपासणीसाठी येत होते. आवश्‍यकता भासली तर ते इतर वेळीसुद्धा येत होते. डॉक्टरांनी आमचे खूपच चांगल्या पद्धतीने उपचार केले. त्यामुळे मी बरा झालो. मी डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांचा आयुष्यभर आभारी राहीन.’’ 

घरी नेहमीप्रणामे आहार 

आता कोरोनामुक्त झाल्यावर घरी स्वतंत्र खोलीत राहत असलो तरी माझा आहार नेहमीप्रणामे आहे. पथ्य अशी काहीच सांगितलेली नाही. त्यामुळे मी दिवसभर घरात राहत असताना सकारात्मक राहतो. कोरोनाचा विचार करीत नाही, असेही त्याने सांगितले. 

लॉकडाऊन पाळा ते आपल्या फायद्याचे 

तुम्हाला कोरोनामुक्त राहायचे असेल तर शासनाचे नियम पाळा, लॉकडाऊन आपल्या फायद्याचे आहे. यामध्ये सामाजिक अंतर अतिशय महत्त्वाचे आहे. डॉक्टरसुद्धा आम्हाला तेच सांगत होते. पोलिसां सर्वांनी सहकार्य करायला हवे. दरम्यान, आम्हाला आमच्या वॉर्डातील हाजी इसाक यांनी खूप मदत केली. मी डॉक्टर, पोलिस प्रशासनांचे कौतुक करेन. ते जे काही करत आहे ते आपल्यासाठीच आहे. तेव्हा त्यांनासुद्धा आपण साथ द्यायला हवी. शेवटी जान है तो जहान हैं.