हुश्श! कोरोना पॉझिटिव्ह प्राध्यापिकेचा अहवाल निगेटिव्ह, सर्व संशयितांचेही...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

  • प्राध्यापक महिलेचा कोरोना अहवाल निगेटिव्ह
  • तिच्या सर्व २१ विद्यार्थ्यांचेही अहवाल निगेटिव्ह
  • आणखी काही दिवस राहणार देखरेखीखाली
  • जिल्हा शल्यचिकित्सकांनी व्यक्त केला आनंद

औरंगाबाद : कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या ५९ वर्षीय प्राध्यापक महिलेची उपचारानंतर चाचणी घेतली असता, तिचा अहवाल आता निगेटिव्ह आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी ही माहिती देत आनंद व्यक्त केला आहे. 

शहरातील या एकमेव कोरोनाग्रस्त महिलेच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. पॉझिटिव्ह असलेल्या कोरोनाग्रस्त प्राध्यापिकेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. आता तिची प्रकृती स्थिर आहे. आपली ट्रीटमेंट अगदी परफेक्ट होती. तिचा अहवाल आता निगेटिव्ह आल्यामुळे आपण सुटकेचा निश्वास सोडल्याचे डॉ. कुलकर्णी म्हणाले. 
 
शहरातील एका संस्थेत प्राध्यापक असलेली महिला रशिया, कझाकिस्तान येथे गेली होती. तेथून त्या तीन मार्चला रोजी शहरात परतल्या. त्यांच्यासोबत आणखी दोघींचा समावेश होता. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची धावपळ झाली. आरोग्य विभागाकडून संबंधित संस्थेतील काही विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली होती.

२१ विद्यार्थ्यांचेही अहवाल निगेटिव्ह

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या प्राध्यापिकेच्या संपर्कातील प्रत्येकाचा शोध घेऊन लक्षणांवरून संशयित रुग्णांचा शोध घेतला जात होता. या प्राध्यापिकेशी संपर्कात आलेल्या २१ विद्यार्थ्यांचेही अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे सुटकेचा निश्वास सोडल्याचे डॉक्टर म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CoronaVirus Covid-19 Positive Patient Is Now Negative Aurangabad Maharashtra