esakal | कोरोनातून बऱ्या झालेल्या औरंगाबादच्या प्राध्यापिका ऑन कॅमेरा... म्हणतात....
sakal

बोलून बातमी शोधा

CoronaVirus News

आजारपणाच्या या काळात मी मृत्यूला अगदी जवळून पाहिले. मी या संसर्गाला बळी पडले, पण प्रवासात अनेक जणांशी माझा संपर्क झाला. त्यांना विषाणूने ग्रासले असेल का? माझ्या आप्त स्वकीयांना माझ्यामुळे हा संसर्ग झाला असेल का? यात त्या निरपराध लोकांचा, माझ्या विद्यार्थ्यांचा काय दोष आहे, असे मला सारखे वाटत असे.

कोरोनातून बऱ्या झालेल्या औरंगाबादच्या प्राध्यापिका ऑन कॅमेरा... म्हणतात....

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : मला हा आजार झाला, याचं वाईट वाटलंच; पण त्याहूनही माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना हकनाक याची शिक्षा मिळणार का, या चिंतेने मला ग्रासलं होतं. आज सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले, त्यामुळे ईश्वराचे लाख लाख आभार आहेत, अशी प्रतिक्रिया कोरोनाची लागण झालेल्या प्राध्यापिकेने दिली आहे. शनिवारी त्या प्रथमच माध्यमांसमोर आल्या.

रशिया, कझाकिस्तानचा प्रवास करून औरंगाबादेत आलेल्या एका प्राध्यापिकेला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आणि आरोग्य यंत्रणेची पाचावर धारण बसली. खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या या महिलेवर उपचार तर सुरू झाले, पण शहरातील एका शिक्षण संस्थेत प्राध्यापक असलेल्या या महिलेच्या संपर्कात तोवर कित्येक विद्यार्थी आणि सहकारी प्राध्यापक आले होते. त्या सर्वांची तपासणी करण्यात आली.

राज्यात कोरोनाचा पहिला बळी मुंबईत, वाचा सविस्तर

या महिलेचा उपचारानंतर स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आला. तो शनिवारी (ता. 21) सुदैवाने निगेटिव्ह आला आणि यंत्रणेने सुटकेचा निःश्वास सोडला. त्याचबरोबर प्राध्यापिकेच्या संपर्कात आलेल्या 21ही विद्यार्थ्यांचे स्वॅबचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या, की आजारपणाच्या या काळात मी मृत्यूला अगदी जवळून पाहिले. मी या संसर्गाला बळी पडले, पण प्रवासात अनेक जणांशी माझा संपर्क झाला. त्यांना विषाणूने ग्रासले असेल का? माझ्या आप्त स्वकीयांना माझ्यामुळे हा संसर्ग झाला असेल का? यात त्या निरपराध लोकांचा, माझ्या विद्यार्थ्यांचा काय दोष आहे, असे मला सारखे वाटत असे. आज सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे मला फार हायसे वाटत आहे.

वैजापुरातून कोरोना संशयित गायब

रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांबद्दलही त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, "इथे रुग्णालयात मी रोज अनेकांना माझी सेवा करताना पाहत होते. डॉक्टर्स नित्यनेमाने माझी विचारपूस करत होते. ट्रीटमेंट उत्तमरीत्या सुरू होती. पण त्यापलीकडे इथल्या परिचारिका आणि वॉर्डबॉईजने मला खूप जपले. हे सगळे माझ्या विद्यार्थ्यांएवढेच, काही जण तर त्याहूनही लहान आहेत. अनेकांच्या घरी त्यांची लहान लहान मुले आहेत. ही मंडळी मला खूप आधार देत राहिली. एक मुलगी रोज सकाळी माझ्याकडून योग, ध्यान करून घेत होती. आमच्यासाठी अनेकांनी प्रार्थना केल्या. असंख्य लोकांनी आमच्या प्रकृतीची विचारपूस केली. या सर्वांचे आज आभार मानावेसे वाटतात"

सर्वांनी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असा सल्ला द्यायलाही त्या विसरल्या नाहीत. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आणि प्राध्यापिकेच्या अमेरिकास्थित डॉक्टर मुलानेही आपल्या भावना माध्यमांपुढे व्यक्त केल्या.

go to top