शुल्क न भरल्यामुळे मुलांना मिळेना ऑनालाइन शिक्षण

संदीप लांडगे
Saturday, 20 June 2020

नोकरी कपात झाल्यामुळे पालकांची बिकट परिस्थिती आहे. असे असताना सीबीएसई, इंग्रजी माध्यमांच्या शाळा, शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कासाठी सक्ती सुरू आहे. त्यामुळे पालक हवालदिल झाले आहेत.

औरंगाबाद ः कोरोनामुळे आर्थिक बजेट कोलमडलेल्या पालकांना इंग्रजी शाळांकडून अजून एक झटका देण्यात आला आहे. जोपर्यंत विद्यार्थ्यांचे शुल्क भरणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्याचा निकाल राखून ठेवला जाईल; तसेच ऑनलाइन शिक्षणाची लिंकही विद्यार्थ्याला शेअर केली जाणार नाही, असा आडमुठेपणा काही सीबीएसई, इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून केला जात आहे. 

नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्याची चाहूल लागताच काही खासगी शाळांनी पालकांच्या बैठका घेऊन ऑनलाइन शिक्षणाच्या नावावर १२ ते १५ हजार रुपये वसूल करण्याचा धंदा सुरू केला. ज्या पालकांकडे शाळेचे शुल्क थकलेले आहे, त्यांच्या मुलांचे निकाल राखून ठेवण्यात येत आहेत; तसेच जोपर्यंत शाळेचे शुल्क भरले जात नाही, तोपर्यंत ऑनलाइन शिकण्यासाठी शाळेकडून तयार केलेली लिंक विद्यार्थ्यांना दिली जात नसल्याचे पालकांनी सांगितले. 

हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान  

याबाबत पालकांनी जाब विचारल्यास ‘तुम्हाला काय करायचं ते करा, शिक्षण विभागात तक्रार केल्यास तुमच्या मुलाचंच मोठ नुकसान होईल,’ असा इशारेवजा सल्ला दिला जात आहे. कोरोना लॉकडाउनच्या काळात सर्वत्र पगार कपात, नोकरी कपात झाल्यामुळे पालकांची बिकट परिस्थिती आहे. असे असताना सीबीएसई, इंग्रजी माध्यमांच्या शाळा, शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कासाठी सक्ती सुरू आहे. त्यामुळे पालक हवालदिल झाले आहेत. 

हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात..

मुलांची होतेय कुचंबणा 
शहरातील अनेक सीबीएसई, इंग्रजी माध्यमांच्या शाळेचे शुल्क साधारण ऐंशी ते नव्वद हजारांच्या आसपास आहे. लॉकडाउनमुळे मार्चमध्येच शाळा बंद केल्यामुळे अनेक पालकांकडे शाळेची थकबाकी आहे. आर्थिक मंदीमुळे पालक सध्या शुल्क भरण्यास असमर्थ आहेत. शाळांकडून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे; मात्र शुल्क न भरलेल्या पालकांच्या मुलांचं शिक्षण थांबलं आहे. इतर मित्र, मैत्रिणी ऑनलाइन शिक्षण घेत असल्यामुळे या मुलांची कुचंबणा होत आहे. अनेक मुलं डिप्रेशनमध्ये गेली असून, त्यांची चिडचिड वाढल्याचे पालकांचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus update No fee No Online Education Aurangabad