Covid-19 : बाळंतपणासाठी गेली अन् कोरोनाबाधा झाली!

माधव इतबारे
Wednesday, 3 June 2020

समतानगर, भीमनगरात नव्याने आढळले रुग्ण 

औरंगाबाद  : शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, ज्योतिनगर भागातून बीड बायपास परिसरात माहेरी गेलेल्या एका बाळंत झालेल्या महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच समतानगर, भिमनगर भागात नव्याने रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे. मंगळवारी (ता. दोन) गणेश कॉलनी, विशालनगर, ज्योतीनगर, मोंढा नाका, विद्यानिकेतन कॉलनी, फाजलपुरा या नवीन भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. 

शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. फैलाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू असले तरी रोज नवनवीन भागात रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी गणेश कॉलनी, विशालनगर, ज्योतीनगर, विद्यानिकेतन कॉलनी, मोंढानाका, फाजलपूरा भागात बाधित रुग्ण सापडले. त्यांना संपर्कातल्या संपर्कातून लागण झाल्याचे समोर आले आहे. ज्योतीनगर येथील महिलेचे माहेर बीड बायपास रोडवर आहे. ही महिला बाळंतपणासाठी दहा दिवसापूर्वी बीडबायपास परिसरात माहेरी गेली होती. तिचा स्वॅब घेतला असता तो पॉझिटिव्ह आला. ती खासगी रुग्णालयात नुकतीच बाळंतीण झाली आहे. महिला पॉझिटिव्ह आढळताच माजी नगरसेविका सुमित्रा हळनोर व माजी नगरसेवक गिरजाराम हळनोर यांनी तातडीने पुढाकार घेत या भागात जंतुनाशक औषधीची फवारणी करून घेतली. 
 
चक्क! मृत शिक्षकाला चेकपोस्टवर ड्युटी...
 
तसेच कैलासनगर पाठोपाठ मोंढानाका भागात एक व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली. त्याला संपर्कातून लागण झाल्याचे समोर आले आहे. गारखेडा परिसर कोरोनासाठी अतिसंवेदनशील भाग म्हणून जाहीर झाला आहे. पुंडलीकनगर, हुसेन कॉलनी, न्यायनगर, विद्यानगर या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. त्यानंतर विशालनगर भागातही एक व्यक्ती बाधित आढळून आली आहे. 
 
प्रशासनाचे वाढले टेन्शन 
समतानगर, भिमनगर भाग कोरोनामुक्तीच्या वाटेवर होता. समतानगरमधील १२ पैकी ११ जण कोरोमुक्त झाले तर भिमनगरमधील सातपैकी सहा रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. असे असताना या भागात पुन्हा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाला नव्याने उपाय-योजना कराव्या लागणार आहेत.  घाटी

रुग्णालयात ३३ रुग्णांची प्रकृती गंभीर 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे उपचार घेणारे ३३ कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर ७५ रुग्णांची स्‍थिती सामान्य आहे, अशी माहिती घाटी रुग्णालयातील माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.  घाटीत एक जूनला सायंकाळी चार ते दोन जून सायंकाळी चारपर्यंत एकूण ६५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील ४६ रुग्णांच्या लाळेची चाचणी घेण्यात आली.

त्यातील १६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सात रुग्णांचे अहवाल कोविड निगेटिव्ह आले, तर २३ रुग्णांचे अहवालाची अजून प्रतीक्षा आहे. सामान्य स्थितीत ७५ रुग्ण असून ३३ गंभीर रुग्णांवर शर्थीचे उपचार सुरू आहेत. आयसीएमआरच्या नियमावलीनुसार, दोन पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. यात शिवशाहीनगर, मुकुंदवाडी येथील ४८ वर्षीय महिला व २५ वर्षीय शासकीय महाविद्यालय परिसरातील पुरुषाला सुटी देण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid-19 positive woman gives birth to Baby