COVID-19 : औरंगाबादचा रुग्णदर का झाला देशाच्या दुप्पट?

Friday, 15 May 2020

अधिक संसर्ग झालेल्या शहराच्या भागात ट्रेसिंगची मदार शक्यतेवर 

औरंगाबाद : केरळमध्ये ३० जानेवारीला वुहानमधून परतलेली वैद्यकीय शाखेची विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह निघाली. त्यानंतर तेथील शासन अत्यंत गंभीर झाले. त्यांनी लगेच सीमा सील केल्या. आपत्ती घोषित केली. समूह क्वारंटाइनपासून सर्व उपायांना सुरवात केली. आज अख्ख्या केरळ राज्यात कोरोनाचे औरंगाबाद शहरापेक्षाही कमी म्हणजे ५३४ रुग्ण आहेत व मृत्यूही चार झाले आहेत.

महाराष्ट्राचे आकडे सोडाच; पण औरंगाबादने केरळला मागे टाकले. आज (ता. १४) जिल्ह्यात ७४७ पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू २० झाले आहेत. अर्थात येथील प्रशासन, अपुरी साधने, उपाययोजना, डाऊन झालेले लॉक आणि नागरिक यांच्यावरही जबाबदारी जाते. 
  

 1. मराठवाड्यातील इतर शहरांत केवळ बाहेरून आलेलेच रुग्ण आहेत, तेही मर्यादित आहेत. यातील बहुतांश जणांनी स्वतःची आरोग्य तपासणी केली; काहींना प्रशासनाने शोधून त्यांची तपासणी केली. त्यांना आयसोलेशन, क्वारंटाइन करणे सहज सोपे झाले. परंतु औरंगाबादेत आलेल्यांची संख्या खूपच मोठी आहे. त्यातील सर्वच जणांची आरोग्य तपासणी झाली असे नाही. चोरीछुप्या मार्गाने आलेल्यांची प्रशासनाकडे नोंद नाही. त्यामुळे चाचणीचा विषयच नाही.  
 2. शहरातून आलेले अनेकजण स्वतःला आयसोलेशन, क्वारंटाइन करीत नाहीत. त्यामुळे संपर्क वाढत गेल्याने शहराच्या अनेक भागांत कोरोनाचा वेगाने फैलाव झाला. त्यामुळे रुग्ण दुप्पट होण्याचा दर देशाच्याही दुप्पट आहे.  
 3.  मुंबई, पुणे, औरंगाबाद व मालेगावसारख्या झपाट्याने संसर्ग झालेल्या शहरांचा देशाचा डबलिंग रेट वाढविण्यात मोठा वाटा आहे. ही चांगली बाब नाही. देशाचा डबलिंग रेट सात ते आठ मेदरम्यान १०.२ एवढा होता. परंतु तो आता दहा टक्क्यांच्या आत आहे. दहा हजार रुग्ण दर तीन ते चार दिवसांत वाढत आहेत. 

शक्यतेवर ट्रेसिंग अवलंबून! 
 टास्क फोर्सची स्थापना २४ एप्रिलला झाली. सुरवातीच्या दिवसांत ट्रेसिंगचे प्रमाण ७० एवढे होते. पण २७ एप्रिलनंतर शहरात उद्रेक झाला, तो आजपर्यंत कायम असून आता ठराविक भागात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केवळ शक्यतेवरच अवलंबून आहे. एक बाब ही की, बाधित रुग्ण प्रशासनाच्या नजरेस येत आहेत. पण त्यातील काही शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात भरती होत आहेत, हीच चिंतेची बाब आहे. 

 

जाणून घ्या -  नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही...

कोरोनाविरोधी लढ्याची सुरवातच अडखळत 
 

 • जानेवारी ते मार्चदरम्यान कोरोनाला सहज घेतले, उलट केरळने गंभीरतेने घेतले. 
 • विदेशातून आलेल्यांची स्क्रीनिंग करून त्यांना सल्ला देऊन घरी सोडले. टेस्ट नाहीच. 
 • जानेवारीनंतर सरकारी गाइडलाइननुसार सुमारे २० दिवस स्क्रीनिंगच्याच भरवशावर गेले. 
 • ट्रॅव्हल हिस्ट्री असलेल्यांना टेस्टची गरज होती, तेव्हा गाइडलाइन्स होम क्वारंटाइनच्या होत्या. त्यातून कॉन्टॅक्ट वाढला. 
 • शहरात बाहेरून आलेल्या बहुतांश जणांना परत पाठविण्यात आले नाही. त्यांना शहरात सामावून घेण्यात आले. 
 • सरकारी माहितीनुसार सरासरी पावणेदोन लाख लोक शहरात आले. हा आकडा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातला आहे. 
 • हायरिस्क झोनमधून आलेल्यांची फक्त स्क्रीनिंग सुरू केली. ताप असेल तरच उपचार केले जात होते. 

 हेही वाचा - औरंगाबादेत१८ महिण्यांच्या बाळाला कोरोना 

 

लॉकडाउननंतर औरंगाबाद... 
 

 • लॉकडाउननंतर शहरात येणाऱ्यांचे प्रमाण मोठे. छुप्या मार्गाने अनेकजण शहरात आले. 
 • प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या अनेकांकडून बाधा झाली. याला लोकही जास्त जबाबदार. 
 • आरोग्य विभागाकडेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम होते. संसर्ग वाढल्यावर टास्क फोर्स (२४ एप्रिल) स्थापन. 
 • सुरवातीलाच समूह क्वारंटाइनच्या पद्धतीचा अवलंब नाही. 
 • काही अपवाद वगळता लोक सेल्फ आयसोलेशन तसेच क्वारंटाइन झाले नाहीत. 
 • महापालिका, पोलिस, घाटी रुग्णालय व जिल्हा रुग्णालय प्रशासनातील समन्वयाचा अभाव 
 • लोकसंख्या सोळा लाखांवर, तुलनेत महापालिकेकडे मनुष्यबळ कमी. 
 • साडेचार हजार कर्मचारीच कार्यरत. त्यातही अनेक ५५ वयापेक्षा अधिक असल्याने घरीच आहेत. 
 • अपुरी वैद्यकीय साधने, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात महापालिकेला मनुष्यबळ प्राप्त झाले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: COVID-19 situation reports at Aurangabad