esakal | नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही...
sakal

बोलून बातमी शोधा

Corona News Aurangabad

शहराचे एकूण क्षेत्रफळ १७३ चौरस किलोमीटर आहे. त्यापैकी १४ चौरस किलोमीटर परिसरात कोरोनाचे रुग्ण असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, नव्या निकषानुसार १२ कन्टेनमेंट झोन जाहीर करण्यात आले असून, या झोनमध्ये लॉकडाउन अत्यंत कडक करण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला.

नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरावर कोरोना विषाणूने हळूहळू आपला विळखा घट्ट केला असून, तब्बल नऊ टक्के भागात कोरोनाबाधित रुग्ण व्यापले आहेत. शहराचे एकूण क्षेत्रफळ १७३ चौरस किलोमीटर आहे. त्यापैकी १४ चौरस किलोमीटर परिसरात कोरोनाचे रुग्ण असल्याचे गुरुवारी (ता. १४) समोर आले आहे. दरम्यान, नव्या निकषानुसार १२ कन्टेनमेंट झोन जाहीर करण्यात आले असून, या झोनमध्ये लॉकडाउन अत्यंत कडक करण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला. विशेष म्हणजे कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आल्यापासून याच उपाययोजनांवर वारंवार चर्चा केली जात आहे. आणखी कडक पद्धतीने अंमलबजावणी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. आज पुन्हा एकदा तेच सांगण्यात आले. 

कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले असल्याने गुरुवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, शहर अभियंता सखाराम पानझडे, ‘घाटी’च्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक सुंदर कुलकर्णी, टास्क फोर्स पथकप्रमुख विधी सल्लागार अपर्णा थेटे यांची उपस्थिती होती. बैठकीत वाढत्या रुग्णसंख्येवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी चाचण्या वाढविल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील संशयितांचा शोध घेण्यास मदत झाली असून, त्यामुळेच रुग्णांची संख्या वाढत असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, केंद्र व राज्य सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार नोटिफाईड कन्टेनमेंट झोन जाहीर केले जात आहेत. शहराचे क्षेत्रफळ १७३ चौरस किलोमीटर एवढे असून, त्यापैकी १४ चौरस किलोमीटर परिसरात कोरोनाचा फैलाव झाला आहे. हे क्षेत्र नऊ टक्के एवढे आहे. शहरातील परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. नव्या नियमानुसार शहरात १२ कन्टेनमेट झोनही यावेळी जाहीर करण्यात आले. या झोनमधून कोरोनाचा प्रादुर्भाव इतरत्र होऊ नये यासाठी लॉकडाउन अधिक कडक करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे जे नियम कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यावर अनेक बैठका झाल्या व प्रत्येकवेळी आणखी कडक आणखी कडक अशीच भाषा प्रशासनातर्फे वापरली जात आहे, तर दुसरीकडे कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी क्लिक करा

हे आहेत निर्णय 
१२ कन्टेनमेंट झोनमध्ये नियमांची कठोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. 
विविध पथके स्थापन करून वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली. 
१४ दिवस अत्यंत कठोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. 
कन्टेनमेंट झोनच्या सीमा सील करणार. 
नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी राहणार. 
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घरपोच करणार. 
पोलिसांची पेट्रोलिंग वाढवणार. 
झोनमधील भागामध्ये ये-जा करणाऱ्यांची नोंद ठेवली जाणार. 
आरोग्य पथकामार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार. 
समाजसेवक, प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक यांना सोबत घेऊन नागरिकांशी संवाद साधणार. 
नागरिकांना घराबाहेर न पडता घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन करणार. 
दुचाकी, चारचाकी वाहनांना बंदी घालणार. 
ज्येष्ठ नागरिकांना घरपोच आरोग्य सुविधा पुरवणार. 
बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना क्वारंटाइन करणार