
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मिलिंद कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि दलित साहित्याच्या संवर्धनात ६० च्या दशकात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रा.ल.बा.रायमाने (वय ८५) यांचे रविवारी (ता.सहा) आज औरंगाबादेत अल्पशा आजाराने निधन झाले.
औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मिलिंद कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि दलित साहित्याच्या संवर्धनात ६० च्या दशकात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रा.ल.बा.रायमाने (वय ८५) यांचे रविवारी (ता.सहा) आज औरंगाबादेत अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार कुठलेही विधी न करता केवळ सामुहिक बुद्धवंदना म्हणून त्यांचा मृतदेह औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
वर्ष १९६३ मध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून मिलिंद महाविद्यालयात रूजू झाल्यानंतर दलित विद्यार्थ्यांना व्यक्त होता यावे यासाठी त्यांनी भित्तीपत्रक सुरू केले. मिलिंदच्या संस्कारांतून घडलेल्या विद्यार्थ्यांचे जीवघेणे अनुभव या हस्तलिखित पाक्षिकातून व्यक्त व्हायला लागले. या नव्या अभिव्यक्तीची राज्य पातळीवर नोंद घेण्यात आली. त्यातूनच पुढे दलित साहित्याची चळवळ उदयाला आली. यात डॉ.म.ना.वानखडे, प्राचार्य म.भि.चिटणीस, प्रा.रा.ग.जाधव आदींसोबत प्रा.रायमाने यांचाही महत्त्वाचा सहभाग होता. दलित साहित्य चळवळीत महत्त्वाची भूमिका असलेल्या अस्मिता, मिलिंद साहित्य परिषदेतही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. बाबासाहेबांचे सहकारी बा.ह.वराळे यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. मिलिंदमध्ये राज्यातून गरीब अतिशय बिकट अवस्थेतून दलित विद्यार्थी येत. प्रा.रायमाने यांनी आईच्या ममतेने या मुलांच्या अडचणी समजावून घेतल्या. त्यांना आयुष्यात उभं राहण्यासाठी सर्व प्रकारची मदत केली.
फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे ब्रेन
प्रा. ल.बा. रायमाने सर आपल्याच नाहीत ही दु:खदायी वार्ता कळाली नि मन भरून आलं. अतिशय सभ्य नि अपरंपार सुसंस्कृत, नितांत निःस्पृह नि निष्कलंक समताधर्मी आणि सखोल अध्ययनशीलतेचे धनी प्रा. ल. बा. रायमाने सर म्हणजे नागसेन वनातील नव्या प्रतिभाशाली सर्जनशील लेखक नि कवींचे तसचं समता व मानवतावादी व्यापक फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे ब्रेन होते. दलित साहित्य चळवळ, नाट्यचळवळ नि एकूणच परिवर्तनवादी व्यापक लढ्याचे वैचारिक आधारस्तंभ होते. अहंकार त्यांना कधी स्पर्शही करू शकला नाही. एवढे ते निगर्वी होते. त्यांना भेटलं की, स्नेह नि ओली माणुसकी भरभरून मिळायची. मराठवाड्यातील ते समता चळवळीचे सानेगुरूजीच होते. माझे व्यक्तिगत मार्गदर्शक नि गुरू होते. मानवचेचा, सभ्यतेचा नि सौहार्दतेचा हा औरंगाबादेतील हिमालय होता! आजच्या फुगीर विद्वत्तेच्या नि अहंकारानं माजलेल्या माणसांच्या शिक्षण नि साहित्यक्षेत्रात असं मानवतेचं नि विद्वत्तेचे वैभव आजकाल पाहायला मिळणं दुरापास्तच... विनम्र आदरांजली. या शब्दात एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुधीर गव्हाणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून आदरांजली वाहिली आहे.
संपादन - गणेश पिटेकर