सव्वा दोन दिवसाला एक शेतकरी मरण जवळ करतोय, बीड जिल्ह्यातील चित्र

suicide
suicide

बीड : कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला आहे. निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना अनेक वेळा शासनाच्या दफ्तरदिरंगाईचाही फटका सहन करावा लागतो. यामुळेच शेतकरी जगण्यापेक्षा मरण जवळ करतोय. जिल्ह्यात दर सव्वादोन दिवसाला एका शेतकऱ्याने मरणाला कवटाळल्याचे आकडेवारीवरुन दिसते.
जानेवारी ते नोव्हेंबर २०२० या ११ महिन्यांत तब्बल १६० शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद शासन दरबारी झाली आहे.

यातील ६७ प्रकरणे प्रशासनाने निकाली काढली असून ५० आत्महत्या मदतपात्र नसल्याचा शेरा मारला गेला आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव, मांजरा असे मोठे सिंचन प्रकल्प बोटावर मोजण्याएवढेच. गोदावरी, सिंदफणा नद्यांसह पैठणचा उजवा कालवा जिल्ह्यातील काही भागांतून गेलेला असला तरी वीजपुरवठा असेल याचीही खात्री नाही. त्यामुळे फळबागा, बागायती, भाजीपाला असे क्षेत्रही अत्यल्प आहे. नऊ लाखांवर शेतकरी संख्या असलेल्या जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी मोसमी शेतीवरच अवलंबून असतात.

दरम्यान, जिल्ह्यात कोरडा दुष्काळ अनेक वेळा तर ओला दुष्काळही अधुन-मधून पिच्छा पुरवित असतो. सरत्या खरीप हंगामात तर सुरुवातीला चांगला पाऊस झाला. पण सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याने उगवणच झाली नाही. नंतर सलग तीन वेळा परतीच्या अतिवृष्टीने झोडपले आणि थोडे बहुत हाती आलेले पीकही वाया गेले. एकीकडे निसर्गाचे दुष्टचक्र असतानाच पुन्हा पंचनाम्यांत दिरंगाई, मदत मिळण्यास उशिर अशीही आडकाठी शेतकऱ्यांसमोर असते. पिकलेले वेळेत विकण्यासाठी हमीभाव केंद्र लवकर सुरु होत नाहीत.


दरम्यान, या सगळ्या दुष्टचक्रामुळे आर्थिक विवंचनेतील शेतकरी मरणाकडे वळत असल्याचे चित्र आहे. मागच्या पाच वर्षांत मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या. यंदाच्या सरत्या वर्षात तर दर सव्वादोन दिवसांनी एका शेतकऱ्याने मरण जवळ केले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत तब्बल १६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद शासन दफ्तरी झाली आहे. म्हणजे एक दिवस आड जाताच एक शेतकरी आत्महत्या झाल्याचे आकडेवारीतून दिसते.

५० शेतकरी मदतीच अपात्र
दरम्यान, १६० शेतकरी आत्महत्येंच्या प्रकरणात ६७ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना शासकीय मदत देण्यात आली आहे. तर, ४३ प्रकरणे जिल्हास्तरीय समितीसमोर चौकशीसाठी ठेवण्यात आली आहेत. मात्र, यातील ५० शेतकऱ्यांच्या आत्महत्या मदतीच्या निकषात बसत नसल्याने त्या अपात्र ठरल्या आहेत.


संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com