esakal | धक्कादायक! वर्षभरापूर्वीचा मृतदेह काढला उकरून, अनैतिक संबंधाचे बिंग फुटू नये म्हणून खून
sakal

बोलून बातमी शोधा

1crime_33

महिलेसोबत अनैतिक संबंधाची माहिती गावातील एका तरुणाला कळाली. ही बाब गावात पसरू नये म्हणून तरुणाचा काटा काढला व मृतदेह पुरून टाकला, अशी कबुली संशयितांकडून मिळाल्यानंतर वर्षभरापूर्वी पुरलेला मृतदेह पोलिसांनी शनिवारी (ता. १२) बाहेर काढला.

धक्कादायक! वर्षभरापूर्वीचा मृतदेह काढला उकरून, अनैतिक संबंधाचे बिंग फुटू नये म्हणून खून

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : महिलेसोबत अनैतिक संबंधाची माहिती गावातील एका तरुणाला कळाली. ही बाब गावात पसरू नये म्हणून तरुणाचा काटा काढला व मृतदेह पुरून टाकला, अशी कबुली संशयितांकडून मिळाल्यानंतर वर्षभरापूर्वी पुरलेला मृतदेह पोलिसांनी शनिवारी (ता. १२) बाहेर काढला. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, गणेश दामोधर मिसाळ (वय २९, रा. अमळनेर, ता. गंगापूर) हा तरुण ऑक्टोबर २०१९ मध्ये बेपत्ता झाला होता. त्याबाबत गंगापूर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याबद्दल तक्रारही नातेवाइकांनी नोंदविली.

या बेपत्ताचा शोध सुरू होता. त्यादरम्यान पोलिसांनी संशयावरून सचिन ज्ञानेश्‍वर पंडित (वय २४) व रवींद्र ऊर्फ पप्पू कारभारी बुट्टे (वय २२, दोघे रा. अमळनेर, ता. गंगापूर) यांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर सचिन पंडित याचे गावातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. ती बाब गणेशला कळाली होती. त्यामुळे तो सचिनला ब्लॅकमेल करीत होता. त्यामुळे त्याचा काटा काढण्यासाठी सचिन व रवींद्र यांनी पूर्वनियोजित कट कारस्थान करून ५ ऑक्टोबर २०१९ ला गणेश मिसाळचे अपहरण केले. त्यानंतर त्याचा दोरीने गळा आवळून खून केला.

पुरावा नष्ट करण्यासाठी गणेशचा मृतदेह अमळनेर शिवारातील पांडुरंग गाढे यांच्या शेतात पुरून टाकला. ही माहिती चौकशीत पुढे आल्यानंतर गंगापूर पोलिसांनी शेतात पुरलेल्या जागी शनिवारी खोदकाम सुरू केले. त्यावेळी सांगाडा निघाला. पोलिसांनी तो ताब्यात घेतला असून, वैद्यकीय प्रक्रिया करण्यात आली आहे. या प्रकरणी संशयित दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, सहायक निरीक्षक प्रल्हाद मुंढे, उपनिरीक्षक रामहरी चाटे, कैलास निंभोरकर, विजय भल्ल, संदीप डमाळे, गणेश खंडागळे, सोमनाथ मुरकुटे, लक्ष्मण पुरी, मनोज बेडवाल, गणेश लिपणे, दत्तात्रेय गुंजाळ यांनी केली. पोलिसांना या तपासाबद्दल १५ हजारांचे बक्षीस देण्यात आले आहे. तपास रामहरी चाटे करीत आहेत.
 

Edited - Ganesh Pitekar

go to top