दहावीच्या कलचाचणीला मुदतवाढ 

संदीप लांडगे
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

 23 ते 31 जानेवारी असा नऊ दिवसांच्या कालावधीत उर्वरित विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी व अभिक्षमता चाचणी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असल्याचे विभागीय मंडळाच्या सचिवांतर्फे कळविण्यात आले आहे. 

औरंगाबाद - इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 27 डिसेंबर ते 18 जानेवारीदरम्यान अभिक्षमता व कलचाचणी घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. अद्याप बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अभिक्षमता व कलमापन चाचणी झालेलीच नाही. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी व अभिक्षमता चाचणी पूर्ण करून घेण्यासाठी शुक्रवारपर्यंत (ता.31) मुदतवाढ देण्यात आली आहे. 

राज्यभरात 27 डिसेंबर ते 18 जानेवारी 2020 या 23 दिवसांच्या कालावधीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि श्‍यामची आई फाउंडेशन यांच्या सामंजस्य करारानुसार सर्व शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कलमापन व अभिक्षमता चाचणी आयोजित करण्यात आली होती; मात्र बहुसंख्य इंग्रजी शाळांना तीन जानेवारीपर्यंत नाताळाच्या सुट्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात प्रीलियम परीक्षा घेण्यात आल्या.

हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले तान्हाजीत बदल

परिणामी, कलचाचणी व अभिक्षमता चाचणी घेण्यासाठी शाळांना आवश्‍यक वेळच मिळाला नाही. कलचाचणीच्या वेळापत्रकावरून अगोदरच शिक्षकांमध्ये नाराजी होती. सध्या पुढच्या महिन्यात दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासामध्ये व्यस्त असल्यामुळे अद्याप कलचाचणी घेण्यासाठी वेळच मिळत नसल्याचे शिक्षकांनी सांगितले. 

हेही वाचा - आंतरराष्ट्रीय गाजलेले चित्रपट पाहायचेत? चला औरंगाबादला! 

तांत्रिक अडचणीमुळे उशीर 
यंदा कलमापन आणि अभिक्षमता चाचणी मोबाईलवरून ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे घेण्यात येत आहे. या चाचणीद्वारे इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांचे कृषी, कला, मानव्यविद्या, वाणिज्य, ललित कला, आरोग्य व जैविक विज्ञान, तांत्रिक, गणवेशधारी सेवा अशा सात क्षेत्रांतील कल जाणून घेतला जात आहे. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर्सवरून महाकरिअर मित्र ऍप डाऊनलोड करून शाळेचा सांकेतिक क्रमांक वापरून परीक्षा घेणे सुरू आहे; परंतु ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधा उत्तम दर्जाची आहे तिथे ऑनलाइन व ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधा चांगली नाही अशा ठिकाणी ऑफलाइन परीक्षा घेणे सुरू आहे.

 सध्या सर्वच कंपन्यांचे इंटरनेट गतिहीन असल्याने परीक्षा घेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे कलचाचणी घेण्यास विलंब लागत आहे. सध्यातरी 23 ते 31 जानेवारी असा नऊ दिवसांच्या कालावधीत उर्वरित विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी व अभिक्षमता चाचणी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असल्याचे विभागीय मंडळाच्या सचिवांतर्फे कळविण्यात आले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deadline is up to 30 days for the test