चळवळीचा बुलंद आवाज बुद्धप्रिय कबीर काळाच्या पडद्याआड 

अनिल जमधडे
बुधवार, 25 मार्च 2020

आंबेडकरी-डाव्या चळवळीचा खंदा समर्थक हरवला

औरंगाबाद : फुले-शाहू-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारधारेशी जीवन समर्पित केलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बुद्धप्रिय कबीर ऊर्फ संजय अर्जुनराव उबाळे (वय ५४) यांचे बुधवारी (ता. २५) दुपारी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. बुधवारी दुपारी साडेचारला त्यांची प्राणज्योत मालवली. बुद्धप्रिय कबीर यांच्या पार्थिवावर सायंकाळी हडको एन-११ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

बुध्दप्रिय कबीर हे विद्यार्थी दशेपासून आंबेडकरी आणि डाव्या चळवळीचे खंदे कार्यकर्ते होते. त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य आंबेडकरी चळवळीस वाहून घेतले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदव्युत्तर व संशोधन विद्यार्थी संघटनेचे ते संस्थापक सदस्य तथा दीर्घकाळ अध्यक्ष होते. तसेच ते दलित अत्याचारविरोधी कृती समितीचे सचिव होते. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

आंबेडकरी चळवळीसोबतच ते गेल्या काही वर्षांपासून डाव्या चळवळीत सक्रीय होते. संघटित कामगारांच्या क्षेत्रातही त्यांनी मोठे काम केले. कुठेही अन्याय अत्याचार झाला तिथे बुध्दप्रिय हजर होत. अशा कुटूबाला न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी राहण्याचा त्यांचा प्रयत्‍न असायचा. चळवळीसाठी ते अविवाहित राहिले. 

रिपब्लिकन नेत्यांच्या ऐक्यासाठी औरंगाबादला झालेल्या दलित हक्क संरक्षण परिषदेच्या आयोजन समितीमध्ये ते सक्रिय होते. त्यांच्या अविरत कामाची दखल घेत त्यांना विविध संघटनांनी मिळून एक दुचाकी खरेदी करून दिली होती. त्यांना गेल्या वर्षी अन्ननलिकेचा दुर्धर आजार झाला होता. त्यांच्यावर शस्त्रक्रीया झाली होती. काही काळ प्रकृती सुधारली होती. मात्र पुन्हा प्रकृती बिघडली.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

तीनच दिवसापुर्वी त्यांना खासगी रूग्णालयात हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाचे सामाजिक, राजकीय चळवळीतील कार्यकर्त्यांनी हळहळ व्यक्त केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demise Of Buddhapriya Kabir Aurangabad News