पीएच.डी. शुल्क आता ऑनलाइन

अतुल पाटील
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पीएच.डी.चे सर्व शुल्क आता ऑनलाइन भरता येणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ही सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध केली आहे.

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पीएच.डी.चे सर्व शुल्क आता ऑनलाइन भरता येणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ही सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध केली आहे. तसेच संशोधकांना प्रगती अहवाल दाखल करण्यासाठी 7 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएच.डी. संशोधकांना प्रगती अहवाल जमा करण्यासाठी 31 डिसेंबर 2019 पर्यंत मुदत देण्यात आली होती. यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधक विद्यार्थी येत असून त्यांच्या सोयीसाठी ऑनलाइन शुल्क भरण्याचे आदेश कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिले होते. यानुसार वित्त व लेखा विभागाने युनिक विभाग आणि स्टेट बॅंक ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून ऑनलाइन शुल्क जमा करण्याची प्रक्रिया सोमवारी (ता. 30) सुरू केली होती. 

प्रगती अहवाल दाखलसाठी गर्दी 
पीएच.डी. संशोधकांचे प्रगती अहवाल दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. शुल्क भरण्यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यानंतर 1 जानेवारी 2020 पासून पीएच.डी.चे सर्व शुल्क ऑनलाइन भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 7 जानेवारी 2020 पर्यंत प्रगती अहवाल व केवळ ऑनलाइन शुल्क भरणा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन शुल्क जमा करावे, असे आवाहन पदव्युत्तर विभागातर्फे करण्यात आले आहे. 

पहिली ऑनलाइन पावती
कुलगुरू डॉ. येवले यांच्या हस्ते पीएच.डी. शुल्काची पहिली ऑनलाइन पावती संशोधक विद्यार्थी विनय लोमटे यांना देण्यात आली. कुलगुरूंच्या दालनात हा कार्यक्रम झाला. यावेळी वित्त व लेखाधिकारी राजेंद्र मडके, उपकुलसचिव संजय कवडे, पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ. दिगंबर नेटके, युनिकचे संतोष पाटील, सचिन चव्हाण व यशपाल साळवे यांची उपस्थिती होती, तर एसबीआयचे उपप्रबंधक ओम तोटेवाड, सहायक प्रबंधक श्रीनिवास पवार यांची उपस्थिती होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University holds a Ph.D. Charges online now