लॉकडाउनमुळे मद्यातून मिळणारा अकराशे कोटींचा महसूल बुडाला, मराठवाड्यातील चित्र

प्रकाश बनकर
Sunday, 20 September 2020

कोरोनामुळे यंदा मद्यनिर्मिती आणि विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५२.८४ टक्के महसुलात घट झाली आहे.

औरंगाबाद : कोरोनामुळे यंदा मद्यनिर्मिती आणि विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५२.८४ टक्के महसुलात घट झाली आहे. यंदा केवळ ९८६ कोटी ८१ लाख ५९ हजार ७२७ रुपयांचाच महसूल प्राप्त झाला आहे. जवळपास ११०५ कोटी ५७ लाख ३९ हजार ९५९ रुपयांचा महसूल कमी आला असल्याचे राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय उपायुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले.

राज्यात मद्यनिर्मितीत अग्रेसर असलेल्या मराठवाड्यातून राज्य सरकारला दरवर्षी हजारो कोटींचा महसूल मिळतो. मराठवाड्यातून मद्यविक्री, निर्मितीतून गेल्या वर्षी सरकारला तब्बल २ हजार ९२ कोटी ३८ लाख ९९ हजार ६८६ रुपयांचा महसूल मिळाला होता. यंदा त्यात तब्बल ५२.८५ टक्क्यांची घट झाली आहे. गेले पाच ते सहा महिने मद्यविक्री बंद ठेवण्यात आली होती. औरंगाबादेत औद्योगिक विभागातील नऊ कंपन्या मद्यनिर्मिती करतात. या कंपन्याही तीन ते चार महिने बंद होत्या.

राज्यभर ट्रान्सपोर्ट श्रेणीतील वाहन परवान्याचा 'पेच'

येथील निर्मिती होणाऱ्या देशी-विदेशी मद्याची सर्वांत जास्त विक्री ही मुंबई, पुणे आणि ठाणे या शहरांत होते. गेल्या वर्षी १ हजार ९२८ कोटी ५५ लाख ६२ हजार ५९९ रुपयांचा महसूल दिला होता. मात्र यंदा केवळ ७६४ कोटी ५५ लाख ४८ हजार ६०७ रुपये महसूल प्राप्त झाला आहे. गेल्या वर्षी ४ कोटी २१ लाख ५७ हजार ५९ लिटर देशी दारूची विक्री झाली. तर यंदा एप्रिल ते ऑगस्ट या चार महिन्यांत २ कोटी ९१ लाख १३ हजार १७५ लिटर दारू विक्री झाली. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३०.९४ टक्के देशीची विक्री घटली. तर गेल्या वर्षी १ कोटी २७ लाख ३५ हजार ८०४ लिटर विदेशी मद्याची विक्री झाली. तर यंदा केवळ ८६ लाख १५ हजार १८८ लिटर विक्री झाली. म्हणजेच यंदा ३२.३५ टक्के घट झाली आहे. बिअरमध्ये ५९.८५ टक्के व वाईनमध्ये २६.४८ टक्के घट झाली आहे.

अहवाल पॉझिटिव्ह, अन् आरोग्य विभागाची गाडी गेली दारूच्या अड्ड्यावर !

जिल्हा ------------ वर्षाचा महसूल-२०१९-२०------२०२०-२१(रक्कम कोटीत)
औरंगाबाद-----------१९२८,५०,६२५९९-------------७६३,५५,४८६०७
बीड----------------१००१३३६०------------------- ५३२७१७००
जालना--------------६३६८३३६---------------------३३८७७४०४
हिंगोली--------------२४०५५३८---------------------५४३२२८२
लातूर---------------१७३१३११७-------------------४१२८१७१३
नांदेड---------------१५०६३७७०३५----------------१७६९२७९४४८
परभणी-------------६२४९३७८---------------------१९३८५२०४
उस्मानाबाद----------९०११०३२३-------------------३१००८३३६९
एकूण---------------२०९२३८९९६८६---------------९८६८१५९७२७

(स्रोत- विभागीय उपायुक्त कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क)

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleven Crores Revenue Through Liquor Wasted Due To Lockdown