
अकरावी ऑनलाइन प्रवेशाची विशेष फेरी जाहीर करण्यात आली आहे. रविवारी रिक्त जागांची यादी करण्यात आली.
औरंगाबाद : अकरावी ऑनलाइन प्रवेशाची विशेष फेरी जाहीर करण्यात आली आहे. रविवारी रिक्त जागांची यादी करण्यात आली. फेरीसाठी नवीन विद्यार्थ्यांनाही सहभागी होण्याची संधी देण्यात आली असून अर्ज भाग-एक, भाग-दोन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष फेरीपूर्वी ३१ हजार ४७० प्रवेशापैकी केवळ १२ हजार ४३१ जागांवरच प्रवेश झालेले आहेत.अकरावी ऑनलाइन प्रवेश फेरीत तिसरी प्रवेश फेरीपूर्ण झाल्यानंतर विशेष फेरीला रविवारपासून सुरू करण्यात आली आहे. तिसऱ्या फेरीसाठी १८७२ विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली होती.
त्यांना शुक्रवारपर्यंत प्रवेश निश्चित करण्यासाठी देण्यात आला होता. परंतु या फेरीत निवड झालेल्या निम्म्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. विशेष फेरीसाठी रविवारी सकाळी रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात आली. त्यासह नवीन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये यापूर्वी अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांना भाग-एक, भाग-दोन भरून प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. औरंगाबाद महापालिका हद्दित अकरावी प्रवेश प्रक्रियेत ११६ कॉलेजांचा सहभाग आहे. या कॉलेजांमधील ३१ हजार ४७० जागांवर प्रवेशाची प्रक्रिया होत आहे. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतील तीन फेरीनंतर रिक्त जागांचा आकडा जाहीर करण्यात आला. शहरात विविध कॉलेजांमध्ये अद्याप १९ हजार ३९ जागांवर प्रवेश रिक्त आहेत. त्यासाठी पुढच्या प्रवेश फेरी होत आहेत.
Edited - Ganeshi Pitekar