बीड - नगर लोहमार्गासाठी राज्याची तरतूद तुटपुंजी, प्रितम मुंडेंचा महाविकास आघाडीला टोला

दत्ता देशमुख
Sunday, 20 December 2020

प्रस्तावित सोलापूर - जळगाव या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाने माहिती दिली. मात्र, नगर - बीड - परळी लोहमार्गासाठी राज्य सरकारने केलेली तरतुद तुटपुंजी असल्याचे खासदार डॉ.प्रितम मुंडे म्हणाल्या. 

बीड : प्रस्तावित सोलापूर - जळगाव या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाने माहिती दिली. मात्र, नगर - बीड - परळी लोहमार्गासाठी राज्य सरकारने केलेली तरतुद तुटपुंजी असल्याचे खासदार डॉ.प्रितम मुंडे म्हणाल्या.  नगर -बीड - परळी रेल्वे प्रकल्पाला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी रेल्वेमंत्री पीयुष  गोयल यांच्याकडे केली. जिल्ह्याच्या दृष्टीने  सोलापूर - उस्मानाबाद - बीड - औरंगाबाद - जळगाव हा  रेल्वेमार्ग अतिशय महत्त्वाचा आहे. या मार्गाचे सर्व्हेक्षण झाले असून कामाला गती मिळावी यासाठी रेल्वेमंत्री गोयल यांच्याकडे पाठपुरावा सुरु असल्याचेही त्या म्हणाल्या. नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पासाठी निधी  देण्याची मागणी देखील त्यांनी मंत्रालयाकडे  केली आहे.

 

 

दरम्यान,  नगर - बीड - परळी  रेल्वेमार्गाच्या कामात विजेचे खांब आणि झाडांमुळे अडथळा निर्माण होतो आहे. तसेच भूसंपादनाच्या प्रक्रियेत येणाऱ्या समस्यांमुळे देखील कामाला विलंब झाला आहे. रेल्वेच्या कामाचा आढावा घेऊन त्यामध्ये येणाऱ्या अडचणी आणि समस्यांवर तोडगा काढण्यासाठी
जिल्हा प्रशासन आणि रेल्वे  विभागासोबत संयुक्त बैठक घेणार असल्याचेही त्या म्हणाल्या. नगर -बीड - परळी रेल्वे मार्गासाठी केंद्र आणि राज्य सरकारने समान निधी देण्याची तरतूद आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेला केंद्राच्या वाट्याचा निधी वेळेवर मिळतो परंतु राज्य सरकार तुटपुंजी तरतुद करत असल्याचेही त्या म्हणाल्या. या रेल्वेमार्गासाठी वार्षिक तीनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद करणे अपेक्षित असताना इतर दोन रेल्वे प्रकल्पांना मिळून अडीशे कोटी रुपये निधी देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Financial Support Of State To Beed Nagar Railway Line, Said Pritam Munde