
आमदार विनायक मेटे यांनी आज औरंगाबादेत पत्रकार परिषदेत घेऊन एल्गार मेळाव्याबद्दल माहिती दिली.
औरंगाबाद: 'मराठा आरक्षणाचा विषय प्रलंबित असताना सरकारमधील वेगवेगळ्या विभागाचे मंत्री भरतीची घोषणा करत आहे. दुसरीकडे मराठा समाजातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यासाठीच साष्टपिंपळगाव व आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आलेल्या या विरोधात शिवसंग्राम संघटनेतर्फे ७ फेब्रुवारीपासून एल्गार मेळावा घेण्यात येणार आहे' अशी माहिती आमदार विनायक मेटे यांनी आज औरंगाबादेत पत्रकार परिषदेत दिली.
मेटे म्हणाले, मराठा आरक्षण आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात आणि सरकारच्या स्तरावर प्रलंबित आहे. पाच फेब्रुवारी रोजी सुप्रीम कोर्टात त्यावर सुनावणी होणार आहे. सरकारने सर्व याचिकाकर्ते आणि त्यांच्या वकिलांना एकत्रित बोलावून यासंदर्भात रणनीती ठरविणे गरजेचे असताना सरकार अद्यापही याबाबत पावले उचलली नाही. सरकार मधील मंत्री भरती बाबत घोषणा करीत आहे. तर, काहींनी भरती प्रक्रियाही सुरू केली आहे. याच नोकरी भरतीवरून मंत्र्यांमध्ये चढाओढ सुरू असल्याचा आरोपही मेटे यांनी केला.
मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्याची प्रकृती खालावली; तातडीने रुग्णालयात...
७ फेब्रुवारीला जालना येथून एल्गार मेळाव्यास सुरुवात होणार आहे. या नंतर नांदेडला अशोक चव्हाण, नागपूरला नितीन राऊत,अनिल देशमुख यांच्याविरोधात तर मुंबई वर्षा गायकवाड, अनिल परब आणि बारामतीला हे एल्गार आंदोलन करण्यात येणार आहे. असेही विनायक मेटे यांनी सांगितले. यावेळी शिवसंग्राम संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर चव्हाण उपस्थित होते.
(edited by- pramod sarawale)