कहरच! ऑर्डरप्रमाणे छापून देत होते शंभर, दोनशेच्या बनावट नोटा

सुषेन जाधव
Thursday, 10 December 2020

बनावट नोटा प्रकरण असून आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. यामध्ये मोठ्या रॅकेटची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

औरंगाबाद: बनावट नोटा छापून बाजारात वस्तू खरेदी करण्यासाठी त्या वापरल्याप्रकरणी सिडको पोलिसांनी मंगळवारी (ता. ८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दोघांना बेड्या ठोकल्या. टीव्ही सेंटर भागातील जय भद्रा तंबाखू शॉप, संजय गांधी मार्केट येथे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.

संदीप श्रीमंत आरगडे (वय ३२, नाथनगर, वैतागवाडी, वीटखेडा परिसर), निखिल आबासाहेब संबेराव (२९, पहाडसिंगपुरा, लेणी रोड, गुरुकृपा शॉपमागे) अशी संशयितांची नावे आहेत. दुचाकीवरून दोघे बनावट नोटा घेऊन टीव्ही सेंटर भागात आल्याची, वस्तू खरेदीसाठी या नोटा वापरल्याची माहिती सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. 
 
पोलिसांनी वरील दोघांना औरंगाबादेतून बेड्या ठोकल्यानंतर त्यांच्या ताब्यातून एक लाख ५०० रुपयांच्या चलनी नोटासारख्या दिसणाऱ्या शंभर, दोनशे, दोन हजार अशा एकाच क्रमांकाच्या अनेक बनावट नोटा जप्त केल्या. संशयितांकडे सखोल चौकशीअंती संशयितांनी धारूर येथील आकाश संपती माने (रा. जाधव गल्ली, धारूर) या साथीदाराची माहिती दिली. उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर यांच्यासह कर्मचाऱ्यांचे पथक धारूरला रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने मानेचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असताना तो शेतात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्याला अटक करून चौकशी केल्यानंतर गावातील त्याच्या ग्राहक सेवा केंद्रावरून बनावट नोटा छापल्याची कबुली त्याने दिली.

पोलिसांनी नकली नोटा छापण्याचे साहित्य, प्रिंटर, लॅपटॉप, पेनड्राइव्ह, शंभर, दोनशे रुपयांच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या. निरीक्षक अशोक गिरी, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, बाळासाहेब आहेर, दिनेश बन, सुभाष शेवाळे, नरसिंग पवार, विजयानंद गवळी, प्रकाश डोंगरे, विशाल सोनवणे, सुरेश भिसे, गणेश नागरे, स्वप्नील रत्नपारखी, लालखॉं पठाण यांनी ही कारवाई केली. बनावट नोटांचे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. 

पावणेचार लाखांचा ऐवज जप्त- 
पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांच्या ताब्यातून आजवर दोन लाख ७६ हजार ४५० रुपयांच्या बनावट नोटा तसेच ९३ हजार ८०० रुपयांचे साहित्य असा एकूण तीन लाख ७० हजार २५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. संदीप आणि निखिलला न्यायालयात हजर केले असता, त्यांना ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी धनश्री भंडारी यांनी आज दिले. या प्रकरणात सहायक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी सरकारतर्फे बाजू मांडली. 

वीस हजारांत एक लाखाच्या बनावट नोटा- 
वीस हजार रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात एक लाखाच्या बनावट नोटा विक्री करीत असल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली आहे. जप्त केल्यापैकी एकसारखे क्रमांक असलेल्या अनेक नोटा असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fake notes printing in maha e seva Aurangabad