साहित्यिकाची शाळेला अनमोल भेट, स्वतःच्या संग्रहातली 200 पुस्तके दिली

संदीप लांडगे
गुरुवार, 9 जानेवारी 2020

'पुस्तक आपल्या दारी' या ज्ञानेश विद्यामंदिर शाळेच्या उपक्रमाला प्रसिद्ध साहित्यिक, लेखक रा. रं. बोराडे यांनी दोनशे पुस्तके भेट दिली.

औरंगाबाद - विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांना वाचनाची गोडी लागावी, या उद्देशाने ज्ञानेश विद्यामंदिर माध्यमिक शाळेत 'पुस्तक आपल्या दारी' हा उपक्रम नवीन वर्षानिमित्त सुरू करण्यात आला. याबाबत 'सकाळ'ने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत प्रसिद्ध लेखक, साहित्यक रा. रं. बोराडे यांनी या शाळेला दोनशे पुस्तक भेट देत या उपक्रमाचे कौतुक केले.

आजच्या आधुनिक युगात मोबाईल, सोशल मीडियामुळे एकमेकांतील संवाद संपत चाललेला आहे. मोबाईलच्या अतिवापराचे परिणाम आरोग्यावर दिसून येत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये चिडचिडेपणा, मुले एकलकोंडी होताना दिसत आहेत.

वाचनामुळे आनंद तर मिळतोच; शिवाय दुःखालाही वाट फुटते. म्हणून ठाकरेनगर येथील ज्ञानेश विद्यामंदिर माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले पालक व नागरिकांना वाचनाची गोडी लागावी यासाठी नवीन वर्षाचा "पुस्तक आपल्या दारी' हा उपक्रम सुरू केला.

यात विद्यार्थी शाळेतील पुस्तक परिसरातील शेजारी, नागरिकांना वाटप करणार; तसेच नंतर परत करणार आहेत. या उपक्रमामुळे वाचनाची गोडी, विविध पुस्तकांची ओळख, आपला इतिहास माहिती होईल.

उपक्रमाला 'सकाळ'चे प्रोत्साहन

यासाठी शाळेच्या ग्रंथालयात अनेक पुस्तके उपलब्ध होती; तसेच विद्यार्थ्यांनीही वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट किंवा इतर वस्तू शाळेत न आणता पुस्तक घेऊन यायचे असा संकल्प करून ग्रंथालयात मोठ्या प्रमाणात पुस्तके जमा केली होती.

या उपक्रमाचे उद्‌घाटन एक जानेवारी नवीन वर्षानिमित्त करण्यात आले. प्रसंगी परिसरातून पुस्तक दिंडी काढण्यात आली होती. सकाळने या उपक्रमाचे सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. हे वृत्त वाचल्यानंतर रा. रं. बोराडे यांनी 'सकाळ'कडे शाळेला पुस्तके भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती.

हेही वाचा - 

दहा महिन्यांच्या बाळांसह ती झाली बेपत्ता, सापडल्यानंतर पतीला म्हणाली...

धक्कादायक! तो म्हणाला, खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलींसमोर केले असे

मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताय? गूगलच्या या सेटिंग्ज माहिती हव्याच! 

विद्यार्थ्यांशी साधला संवाद

बदलत्या काळानुसार वाचनाकडे मुलांचा कल कमी झाला आहे. यावेळी रा.रं. बोराडे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे फायदे, वाचनाची आवड जोपासण्यासाठी काय करावे, याविषयी मार्गदर्शन केले. तसेच शालेय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला.

वाचन संस्कृती जपावी. मुलांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी. त्यासाठी घरातही वाचनाची आवड निर्माण होणे गरजेचे आहे. त्या हेतूने आम्ही शाळेतील पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत.

शिवाय वाढदिवसाला मुले शाळेला पुस्तक भेट देतात. त्या पुस्तकांना या उपक्रमात वापरले जात असून, प्रत्येक विद्यार्थी, त्याचे पालक आणि परिसरातील सर्वांनी वाचन संस्कृती उपक्रमात सहभागी व्हावे, असे मुख्याध्यापक रामनाथ पंडुरे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Famous Writer R R Borade Donated Books To DnyanPrakash School In Aurangabad