शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकू लागला कर्जमुक्तीचा आनंद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

जिल्ह्यात या योजनेमध्ये एकुण २ लाख २४ हजार ८८३ एवढे लाभार्थी आहेत. त्यापैकी २ लाख २३ हजार ५६६ लाभार्थ्यांचे आधार जोडणी झालेली असून १ हजार २७७ लाभार्थ्यांचे आधार जोडणी प्रक्रिया बॅंकांमार्फत तसेच क्षेत्रीय अधिकारी यांच्याद्वारा संबंधितांशी संपर्क साधून लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.

औरंगाबाद : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणास जिल्ह्यात पैठण तालुक्यातील पाचोड (बु) येथून सोमवारी (ता.२४) सुरवात करण्यात आली. योजनेतील लाभार्थ्यांची प्राथमिक यादी पाचोड येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेत पैठण बाजार समितीचे सभापती राजू भुमरे यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आली. लाभ मिळाल्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होत असल्याचे जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी सांगितले. 

थम्ब इम्प्रेशन घेऊन कर्जमाफीचे प्रमाणपत्र

राज्य सरकारने जाहीर केलल्या कर्जमुक्‍ती योजनेची सुरवात करण्यासाठी पैठण तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या पाचोड बुद्रूक व सिल्लोड तालुक्‍यातील सिल्लोड गावांची प्रायोगिक तत्त्वावर कर्जमुक्‍तीसाठी निवड करण्यात आली.

हेही वाचा - विनाअनुदान शाळांना मिळणार अनुदान 

योजनेत पाचोड (बु) मधील ग्रामीण बँक, राष्ट्रीयकृत बँक, बँक ऑफ बडोदा, जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या २४२ सभासदांची प्राथमिक यादी शासनाने त्या-त्या बँकांच्या स्तरावर प्रसिद्ध केलेली आहे. त्यापैकी ५५ सभासदांचे आधार प्रमाणीकरण यशस्वी झाले आहे. सिल्लोड गावातील ५८२ लाभार्थी शेतकऱ्यांच्या ८९९ खात्यांपैकी १८० खात्यांचे आधार प्रमाणीकरण यशस्वीरित्या पूर्ण झाले असून उर्वरित आधार प्रमाणीकरण करण्याचे काम जिल्हा बँकेत आणि आपले सरकार सेवा केंद्रावर सुरू आहे.

हेही वाचा - स्टॅम्प ड्युटीमुळे खेळण्यांचे मार्केट संथ

ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीत आहे, त्यांचे थम्ब इम्प्रेशन घेऊन कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले जात आहे. सोमवारी पाचोड येथे जिल्हा बँकेतील ९६, एसबीआयचे ४६, ग्रामीण बँकेचा १, बँक ऑफ महाराष्ट्रचे ९८, बँक ऑफ बडोदाचा १ कर्जदार कर्जमुक्त झाला. पाचोड येथील एकूण २४२ शेतकरी कर्जमुक्त झाले. 

२ लाख २३ हजार ५६६ लाभार्थ्यांची आधार जोडणी 

जिल्ह्यात या योजनेमध्ये एकुण २ लाख २४ हजार ८८३ एवढे लाभार्थी आहेत. त्यापैकी २ लाख २३ हजार ५६६ लाभार्थ्यांचे आधार जोडणी झालेली असून १ हजार २७७ लाभार्थ्यांचे आधार जोडणी प्रक्रिया बॅंकांमार्फत तसेच क्षेत्रीय अधिकारी यांच्याद्वारा संबंधितांशी संपर्क साधून लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.

आतापर्यंत ९९.४३ टक्के लाभार्थ्यांची आधार जोडणी झालेली आहे. तसेच १९९४९५ एवढ्या लाभार्थ्यांची माहिती बॅंकांद्वारा पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे . तसेच उर्वरीत लाभार्थ्यांची माहिती अपलोड करण्याची प्रक्रिया बॅंकांद्वारा सुरू आहे. या योजनेव्दारे अंदाजीत सरासरी १४८२ कोटी ७० लाख एवढ्या रकमेची कर्जमाफी होणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेडे यांनी सांगितले.

हेही वाचा - रस्त्यावरच मुलांना मोफत शिक्षणाचे धडे

भूमरे आणि दाबशेडे यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सहायक निबंधक दिलीप गवंडर, माहिती तंत्रज्ञान अधिकारी मयुर मयंक, कर्ज वितरण अधिकारी श्याम तांगडे, श्री. गोर्डे, श्री. बारगजे, श्री. कासार, पाचोड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष जिजा पा.भुमरे, राम पा.नरवडे, भास्कर दळवी, अंकुश नरवडे, शिवाजीराव भुमरे, आबा पा.भुमरे, पाचोडचे (खु) सरपंच नितिन वाघ आदी उपस्थित होते. 

शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान 

योजनेंतर्गत पाचोड येथील भास्कर दळवी यांना ४६८५४ रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. ही शेतक-यांसाठी अतिशय उपयुक्त योजना असून अशी चांगली योजना राबवल्याबद्दल त्यांनी समाधान आणि शासनाचे आभार व्यक्त केले.

अंकुश नरवडे या शेतकऱ्याने १ लाख ९७ हजार ६१६ एवढी मोठी कर्जमुक्ती मिळणार असल्याने खुप मोठा भार हलका झाल्याचे समाधान व्यक्त केले. सुभाष भोजने, दिलीप भूमरे, पांडूरंग भूमरे या शेतक-यांनी कर्जमुक्तीमूळे मोठा दिलासा मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा - सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय होणार बंद ?

माझ्यावर २० हजार रूपयांचे पीककर्ज होते परंतु या सरकारने गरिबांचे दु:ख जाणुन सोप्या पद्धतीने कर्जमुक्ती केली. त्यामुळे शासनाने ही कर्जमुक्ती करून चांगला हातभार लावल्याची भावना श्रीमती ज्योती भुमरे यांनी व्यक्त केली.

अमोल भूमरे यांनी कुठल्याही प्रकारचे हेलपाटे न घालता सहजपणे ही कर्जमुक्ती मिळाल्याचा आनंद व्यक्त करून शासनाच्या गतिमान कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer Crop Loan in Aurangabad