शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फेकले सोयाबीन, टोमॅटो, मका, बाजरी

मधुकर कांबळे
Monday, 19 October 2020

पावसाळ्यात आधीच सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, त्यात पुन्हा परतीच्या पावसाने नुकसानीत भर पाडली. यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७५ हजार रूपयांची अर्थिक मदत देण्या यावी अशी मागणी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्यावतीने करण्यात आली.

औरंगाबाद : या वर्षीच्या पावसाळ्यात आधीच सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, त्यात पुन्हा परतीच्या पावसाने नुकसानीत भर पाडली. यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७५ हजार रूपयांची अर्थिक मदत देण्या यावी अशी मागणी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्यावतीने करण्यात आली. या दरम्यान पोलिसांशी आंदोलक शेतकऱ्यांची बाचाबाची झाली. त्यात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतमाल टाकून देत सरकार आणि प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

जैन इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईचा प्रस्ताव, शुल्क वसुलीची सक्ती केल्याचा ठपका

यावर्षीच्या पावसाने कहरच केला.सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस झाला. त्यात शेतीच बरेच मोठे नुकसान झाले. त्याचा हिशोब लावत नाहीत तोच परतीच्या पावसानेही चांगलेच झोडपले आहे. यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने व परतीच्या पावसाने खरिपाची उभी पिके, काढणी करून ठेवलेली पिके सडली आहेत. कापुस, तूर, मुग, भुईमुग, सोयाबीन, उडीद, बाजरी, मका यांच्यासह फळबागांचे नुकसान झाले आहे. यामुळे हवालदिल झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.१९) जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन केले.

जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष जाधव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलन गनीमी काव्याने केले जाणार असल्याने आंदोलक केंव्हा येतील याचा नेम नव्हता त्यामुळे पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. तरीही अचानक आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले, त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा, हेक्टरी ७५ हजार रूपयांची अर्थिक मदत देण्यात यावी अशा घोषणा देण्यास सुरूवात केला. कार्यालयाच्या पोर्चमध्ये या घोषणा दिल्या जात होत्या.

आता खुशाल खेळा! मैदाने खुले करण्याचे औरंगाबाद महापालिका प्रशासकांचे आदेश

पोलिसांनी त्यांना आंदोलन परिसराबाहेर करण्याचे सांगीतले. यावेळी पोलिस आंदोलकांत बाचाबाची झाली. आंदोलकांनी सोबत आणलेले सोयाबीन, टोमॅटो, मका , बाजरी आदी शेतमाल तिथेच फेकून दिला. पोलिसांनी त्यांना बाहेर काढून रस्त्याच्या पलिकडे आंदोलने , उपोषणे होतात तिथे सोडले. त्या ठिकाणी आंदोलकांनी घोषणाबाजी करत ठिय्या दिला. नंतर शिष्टमंडळांने जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

मागण्या
० पंचनामे न करता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विनाअट सरसकट हेक्टरी ७५ हजार रूपयांची मदत दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी.
० जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा
० नुकसान झालेल्या फळबागासाठी हेक्टरी १ लाख रुपये तातडीची मदत द्यावी
० रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत द्यावी
० कृषी पंपाचे सरसकट वीज बील माफ करावे
० खरिप हंगामासाठी ३० सप्टेंबर २०२० पर्यंत बॅंकांनी दिलेले पिक कर्ज माफ करावे
० फळबागांसहित सर्व पिकांचा पिकविमा तात्काळ मंजूर करावा.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Agitation Before District Collectorate Aurangabad News