
औरंगाबाद महापालिका प्रशासनाने अनलॉक प्रक्रियेत सोमवारपासून (ता. १९) शहरातील खेळाची मैदाने खेळाडूंना सराव करण्यासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे.
औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने अनलॉक प्रक्रियेत सोमवारपासून (ता. १९) शहरातील खेळाची मैदाने खेळाडूंना सराव करण्यासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट, खो-खो या खेळांसह इनडोअर खेळण्यास परवानगी दिली जाणार आहे.
खेळाडूंना मैदानावर सुरक्षित अंतर ठेवून मास्कचा वापर करावा लागेल. १० वर्षांखालील व ६५ वर्षांवरील व्यक्तींना मैदानावर जाण्यास बंदी आहे. कोरोना संसर्गामुळे गेल्या सहा महिन्यांपासून मैदाने बंद होते.
औरंगाबादच्या टोमॅटोचा देशभर डंका; मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थानात दररोज पन्नास टनाची विक्री
आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे खेळाची मैदाने खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचे नियम पाळून खेळाडूंना मैदानावर खेळता येणार आहे. सोमवारपासून महापालिका प्रशासनाने शहरातील मैदाने खुले करण्याबाबत आदेश जारी केले आहेत. मैदानावर गर्दी न होऊ देता क्रिकेट, खो-खो यासह बॅडमिंटन, लॉन टेनिस, जिम्नॅस्टिक या इनडोअर खेळांच्या सरावासाठी परवानगी दिली जाणार आहे. मात्र, क्रीडा स्पर्धा, खेळाचे उपक्रम, संमेलने घेण्यास बंदी असणार आहे.
हे नियम पाळावे लागणार
-मैदानावर फिजीकल डिस्टन्सिंग.
-सरावासाठी आवश्यक तेवढ्याच मर्यादित खेळाडूंना प्रवेश
-सर्वांना मास्कचा वापर करणे बंधनकारक
-इनडोअर सराव करताना दारे, खिडक्या उघडी ठेवावीत, एसीचा वापर टाळावा
-मैदानाच्या प्रवेशद्वारावर तसेच मैदानावर, इनडोअर हॉल येथे सॅनिटायझर असावे.
-कोविड लक्षणे नसलेल्या खेळाडूंना सरावासाठी प्रवेश द्यावा
-ताप, सर्दी, खोकला या सारखी लक्षणे असल्यास परवानगी देऊ नये
-खेळाडूंची रोज नोंद ठेवावी.