मजुरांअभावी कापसाच्या वेचणीवर जातोय अर्धा खर्च! शेतकरी शाळकरी मुलामुलींसह शेतात

हबीबखान पठाण
Tuesday, 3 November 2020

यंदा जून महिन्याच्या प्रारंभी समाधानकारक पाऊस झाल्याने पैठण तालुक्यात कपाशीच्या क्षेत्रात कमालीची वाढ झाली.

पाचोड (जि.औरंगाबाद)  : यंदा जून महिन्याच्या प्रारंभी समाधानकारक पाऊस झाल्याने पैठण तालुक्यात कपाशीच्या क्षेत्रात कमालीची वाढ झाली. अन् कापूस वेचणीला येताच सततच्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांची भंबेरी उडाली. सर्वत्र कापूस वेचणीचे काम एकत्र आल्याने व पिकांत पाणी साचल्याने मजुरांची टंचाई निर्माण निर्माण होऊन कापुस वेचणीचे दर आकाशाला भिडले असल्याचे चित्र पाचोडसह (ता.पैठण) परिसरात पाहावयास मिळते.

पैठण तालुका कापसाचे आगार म्हणून ओळखले जाते. उत्पादित कापसाचा धागा उच्च प्रतिचा असल्याने त्याला पसंती अधिक आहे. त्यातच नगदी पिक म्हणून कापसाकडे शेतकरी आकर्षित झाला. मात्र यंदा सलग चार महिन्यापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे अर्ध्या क्षेत्रावरील पिक वायाला गेले. पाच महिन्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने सर्व शेतीकामे एकत्रित येऊन मजुराची वाणवा निर्माण झाली. मजुर आपल्याकडे खेचण्याची शेतकऱ्यांत स्पर्धा सुरु झाली.

शेंद्रा, बिडकीन डीएमआयसीत होणार नवे पोलीस ठाणे 

शाळकरी मुलांमुलीसह कुटुंब दिवस उगवण्यापूर्वीच शेतावर जाऊन कापुस वेचणी करताना दिसत आहेत. अनेक शेतकरी शेतमजूराना वेचणीसाठी कापसांत बटई देत आहे. सध्या कापूस वेचणीचे दर प्रतिकिलो १२ ते १४ रुपये आहे. अन् बाजारात कापसाला ४० ते ४५ रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. एकंदरीत एकरी दहा क्विंटल होणारे उत्पन्न चक्क एक दीड क्विंटल होत असल्याने शेतकऱ्याचा शेतीवर झालेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतातूर बनला आहे.

 

अतिवृष्टीमुळे कपाशीचे आतोनात नुकसान झाले. सध्या शिल्लक राहिलेल्या कापसाची वेचणी सुरु आहे. हा कापुस वेचण्याकरीता मजुर मिळत नसल्याने १२ ते १४ रुपये प्रतिकिलो मजुरी द्यावी लागत आहे व मजुर आणण्यासाठी गाडी भाडे १२०० रुपये द्यावे लागते. यातच कापसाला बाजारपेठेत ४० ते ४५ रुपये प्रतिकिलोप्रमाणे दर मिळत आहे. एकुणच यंदा शेतीवर झालेला खर्चही निघणे कठिण झालेले आहे. पुढील हंगाम कसा करावा ही चिंता भेडसावत आहेत.
- भाऊसाहेब तांबे, शेतकरी, तांबे डोणगाव

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers With Their Children Collection Of Cotton Aurangabad News