जेवणातल्या अळीवरून कोविड सेंटरमध्ये हाणामारी

माधव इतबारे
Monday, 21 September 2020

चिकलठाणा एमआयडीसी भागातील सिपेट कंपनीत महापालिकेने कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणी सुमारे २४७ रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र निकृष्ट जेवणाच्या तक्रारीवर हे सेंटर वादात सापडले आहे.

औरंगाबाद ः कोविड केअर सेंटरमध्ये दिलेल्या जेवणात अळी निघाल्याच्या तक्रारीवरून सोमवारी (ता. २१) सिपेट कंपनीच्या परिसरातील कोविड केअर सेंटरमध्ये राडा झाला. तक्रारदार रुग्ण व जेवण पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांमध्ये हाणामारी झाली व प्रकरण तोडफोडीपर्यंत गेले. रुग्णांनी कंत्राटदारांवर दगड भिरकावले व त्याच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. मात्र कंत्राटदार रुग्णांपर्यंत पोचला कसा? याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण केले जात आहे. महापालिकेच्या या सेंटरवर वारंवर निकृष्ट जेवण्याच्या तक्रारी समोर येत आहेत. 

चिकलठाणा एमआयडीसी भागातील सिपेट कंपनीत महापालिकेने कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणी सुमारे २४७ रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र निकृष्ट जेवणाच्या तक्रारीवर हे सेंटर वादात सापडले आहे. याठिकाणी जेवण पुरविण्याचे कंत्राट महापालिकेने इंद्रिस मुन्शी या कंत्राटदाला दिले आहे. रुग्णांच्या संख्येवरून रोज जेवणाची ऑर्डर दिली जाते. सोमवारसाठी २६० जणांच्या जेवणाची ऑर्डर होती.

हेही वाचा- जायकवाडीचे 27 दरवाजे उघडले

त्यानुसार कंत्राटदाराने दुपारी जेवण आणून दिले. मुलांच्या वसतिगृहातील एका रुग्णाच्या जेवणात अळी निघाल्याने त्याने हा प्रकार कर्मचाऱ्याला सांगितला. कर्मचाऱ्याने वरिष्ठांना माहिती दिली. अळी निघाल्याची माहिती सर्वच रुग्णापर्यंत पोचली. त्यामुळे रुग्ण एकत्र जमले व कंत्राटदाराला आमच्यासमोर बोलवा, अशी मागणी केली. गोंधळ वाढल्याने कर्मचाऱ्याने थेट कंत्राटदाराला फोन करून माहिती दिली. कंत्रटाराचा भाऊ याठिकाणी आला. त्याच्यासोबत अन्य तीन जण होते. 

रुग्ण भाजपचा पदाधिकारी 
कंत्राटदाराची माणसे आल्याचे कळताच सर्वच रुग्ण मोकळ्या मैदानात जमा झाले. त्यांनी जेवणात अळी निघाल्याचा जाब विचारला. त्यातून एका रुग्णासोबत मुन्शी यांचा चांगलाच वाद पेटला. ‘मी कोण आहे माहीत आहे का तुला? मी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. असे तो रुग्ण म्हणत असताना वाद विकोपाला गेला व त्यांच्यात हातापायी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. सुरवातीस कंत्राटदाराच्या भावाने मला झापड मारली, असे रुग्णांचे म्हणणे आहे. 

ऑनलाईन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार

सुरक्षित अंतराचा फज्जा 
कोविड केअर सेंटरमध्ये इतरांना जाण्यास मज्जाव आहे. असे असताना कंत्राटदारचे माणसे व रुग्ण समोरा-समोर आलेच कसे असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे त्यांच्या सुरक्षित अंतर देखील राखले गेले नाही. वादामुळे एकच गोंधळ उडाला. त्यामुळे डॉक्टर्स, कर्मचारी आणि सुरक्षारक्षकही धावून आले. पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने सर्वांनी अंतर ठेऊन बोलावे अशी सूचना त्यांनी केली मात्र वाद एवढा भडकला की कोणीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दरम्यान वादानंतर कंत्राटदाराची माणसे वाहनाकडे निघाले. यावेळी संतप्त तरुण रुग्णांनी त्यांच्या दिशेने दगड भिरकावले. 

सुटी झालेल्या रुग्णास बदडले 
गोंधळ सुरू असताना रुग्णालयातून सुटी झालेला एक रुग्ण घरी जाण्यासाठी बाहेर पडला. तो उभ्या असलेल्या ठिकाणीच वाद सुरू होता. यावेळी या रुग्णालाच पुरवठादाराचा माणूस समजून मारहाण करण्यात आल्याचे, सूत्रांनी सांगितले. 

पोलिस आयुक्तांना निवेदन 
रुग्णांनी पोलिस आयुक्तांना निवेदन दिले असून, कंत्राटदारांवर गुन्हे दाखल केल्याशिवाय आम्ही चहा, नाष्टा, जेवण घेणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fight at Kovid Care Center Aurangabad