
कोरोना लसीकरणाची तयारी सुरूच असून, सर्वात पहिले लसीकरण केंद्रावर कर्तव्य बजावणारे वैद्यकीय अधिकारी, एएनएम, पोलीस व इतर कर्मचाऱ्यांना केले जाणार आहे.
औरंगाबाद : कोरोना लसीकरणाची तयारी सुरूच असून, सर्वात पहिले लसीकरण केंद्रावर कर्तव्य बजावणारे वैद्यकीय अधिकारी, एएनएम, पोलीस व इतर कर्मचाऱ्यांना केले जाणार आहे. १० जानेवारीपर्यंत प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आदेश प्रभारी प्रशासक तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गुरुवारी (ता.३१) दिले. कोरोनाची लस जानेवारी महिन्यात उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानुसार लसीकरणाची तयारी सुरू असून, महापालिका प्रशासकांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समिती तयार करण्यायत आली आहे.
या समितीची बैठक गुरुवारी घेण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रभारी प्रशासक तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण होते. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी लाभार्थ्यांचा डाटा अपलोड करण्यासंदर्भात सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. डॉ. मुजीब यांनी कोविड लस, लाभार्थ्यांना हाताळणे, लसीकरण केंद्र निर्मितीसंदर्भात प्रशिक्षण दिले. आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना राणे यांनी महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली.
शासनाचे चार हजार ३६८, खासगी सात हजार ३६७ अशा ११ हजार ७३५ आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा अपलोड करण्यात आलेला आहे. उर्वरित डेटा दुरुस्ती करून अपलोड करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती डॉ. मेघा जोगदंड यांनी दिली. बैठकीस अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, उपआयुक्त सुमंत मोरे, वैद्यकीय नोडल अधिकारी, वॉर्ड अधिकारी, पोलीस उपायुक्त अशोक बनकर, जागतिक आरोग्य संघटनेचे जिल्ह्याचे सीव्हीलन्स ऑफिसर डॉ. मुजीब सय्यद यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते.