औरंगाबाद : पुलाची सेंट्रिंग कोसळली, पाच मजूर दबून जखमी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 February 2020

एकजण गंभीर : वैजापूर तालुक्‍यातील लाडगावजवळील घटना 

वैजापूर (जि. औरंगाबाद) - वैजापूर शहरानजीक सुरू असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर असून, पुलाची सेंट्रिंग अचानक कोसळल्याने पाच मजूर दबून गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (ता. 17) सकाळी घडली. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

सुखेदास (वय 25), बिल्लू माजीद (वय 21), रवीकुमार (वय 25), रफिक (वय 20), प्रीतमकुमार (वय 21) अशी जखमींची नावे आहेत. लाडगाव रस्त्यावरील शहरानजीक असलेल्या रोठी परिसरात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. या महामार्गावर पूल उभारण्यात येत असून, यासाठी सेंट्रिंग उभी करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी काम सुरू असताना जोराची हवा आल्याने अचानक ही सेंट्रिंग कोसळून मजुरांच्या अंगावर पडली. या सेंट्रिंगच्या गजाखाली पाचजण दबले गेले. त्यामुळे परिसरात काम करीत असलेले अन्य मजूर त्यांना वाचविण्यासाठी धावले. ही घटना घडल्यानंतर तेथे मोठा गोंधळ उडाला.

हेही वाचा -  CCTV : धडधडत्या रेल्वेने काळजाचा ठोका चुकला, तीन सेकंदांनी वाचले तिघांचे प्राण

घटनेनंतर या बाबीची माहिती संबंधित कंत्राटदारास कळविण्यात आली. क्रेनच्या साह्याने सेंट्रिंगखाली दबलेल्या मजुरांना तत्काळ बाहेर काढण्यात आले. परंतु यातील एक मजूर जास्त दबल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी बराच वेळ लागला. तो या घटनेत गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. त्याच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ज्या ठिकाणी ही सेंट्रिंग कोसळली, त्याच्या आजूबाजूला अन्य मजूरही काम करीत होते. परंतु त्यांना कोणतीही इजा झाली नाही. ज्या पुलासाठी ही सेंट्रिंग उभारण्यात आली होती, त्या पुलाची उंची जमिनीपासून जवळपास 30 फूट आहे. सेंट्रिंगचे लोखंडी गज, प्लेटा मजुरांच्या अंगावर कोसळल्याने मजूर दबले गेले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five laborers Injured At Vaijapur