आनंदाची बातमी: औरंगाबादेतील साडेपाच हजार कंपन्या सुरू, १ लाख कामगार झाले रुजू

प्रकाश बनकर
Tuesday, 2 June 2020

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व एमआयडीसीमधील कंपन्या हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. सध्या वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन, पैठण एमआयडीसीसह खासगी मिळून ५ हजार ४८० कंपन्यांचे युनिट सुरू झाले आहेत. तर एक लाख ६४ हजार ६३३ कामगारांनी कामाच्या ठिकाणी हजेरी लावली असल्याची माहिती एमआयडीसीतर्फे देण्यात आली आहे.

औरंगाबाद: जिल्ह्यातील सर्व एमआयडीसीमधील कंपन्या हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. सध्या वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन, पैठण एमआयडीसीसह खासगी मिळून ५ हजार ४८० कंपन्यांचे युनिट सुरू झाले आहेत. तर एक लाख ६४ हजार ६३३ कामगारांनी कामाच्या ठिकाणी हजेरी लावली असल्याची माहिती एमआयडीसीतर्फे देण्यात आली आहे.

हेही वाचा- CoronaUpdate: औरंगाबादेत आज ५५ रूग्णांची भर, एक मृत्यू @१६४२
 

जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रातील फार्मास्युटिकल कंपन्या वगळता इतर कंपन्या बंद होत्या. केंद्र व राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग नसलेल्या झोनमध्ये सशर्त उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी दिली. यामुळे वाळूज, शेंद्रा येथे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात बजाजसह मोठ्या कंपन्या व त्यांच्यावर अवलंबून असलेले वेंडर यांचे युनिट सुरू झाले आहेत. आठवड्याभरापूर्वी चिकलठाणा व रेल्वेस्टेशन एमआयडीसीतील उद्योगांना महापालिकेतर्फे परवानगी देण्यात आली.

सध्या चिकलठाणा, रेल्वेस्टेशन, पैठणसह ग्रामीण भागातील इतर खासगी उद्योगही सुरू झाले आहेत. एमआयडीसीकडे ७ हजार ५०७ अर्ज आले होते. त्यांना ‘सेल्फ डिक्लेरेशन’ प्रमाणपत्र एमआयडीसीतर्फे देण्यात आले. तर एक लाख ६४ हजार ६६३ कामगारांची नोंद एमआयडीसीकडे करण्यात आली आहे. ३ हजार ५५० कंपन्यांच्या बसला परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती एमआयडीसीचे विभागीय अधिकारी राजेश जोशी यांनी दिली.

वाळूज एमआयडीसी
- ४ हजार ७२३ युनिट सुरू झाले
- ८० हजार ४९२ कामगार कामावर हजर

शेंद्रा एमआयडीसी
- ३८७ कंपन्यांचे युनिट सुरू
- ६ हजार १७० कामगार कामावर

चिकलठाणा एमआयडीसी
- ६८७ युनिट सुरू
- १२ हजार १४८ कामगार कामावर

रेल्वेस्टेशन एमआयडीसी
- १७१ कंपन्यांचे युनिट सुरू
- १५४८ कामगार कामावर हजर

सर्व एमआयडीसीमधील ८० टक्के युनिटचे ऑपरेशन सुरू झाले आहे. प्रत्येक युनिटमधून तीस ते पस्तीस टक्के उत्पादन सुरू झाले आहे. असे असले तरी देशातील मार्केट बंद असल्याने नवीन ऑर्डर मिळण्यास अडचण येत आहे. अजूनही काही लोकांमध्ये भीती आहे. यामुळे ते कंपनीत आलेले नाहीत. वाहतूकही सुरू झाली नसल्याने अडचण येत आहे.
- मुकुंद कुलकर्णी, अध्यक्ष, सीआयआय

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five Thousand Five Hundred Companies Plant Working Started Aurangabad News