विजेच्या धक्क्याने चार जण भाजले, दुरुस्तीचे काम करताना घडली घटना

रामराव भराड
Saturday, 19 September 2020

औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज येथे विजेच्या धक्क्याने चार जण भाजल्याची घटना घडली आहे.

वाळूज(जि.औरंगाबाद) : परवानगी न घेता महावितरणच्या उपकेंद्रात प्रवेश करून दुरुस्तीचे काम करताना विजेचा धक्का बसल्याने व्हेरॉक कंपनीचा व्यवस्थापक आणि तीन इलेक्ट्रिशियन असे चारजण भाजले. त्यातील एक गंभीर आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १८) वाळूज औद्योगिक वसाहतीत घडली.

महावितरणचे वाळूज औद्योगिक वसाहतीतील एल सेक्टरमध्ये उपकेंद्र आहे. या उपकेंद्रातून ३३ हजार व्होल्टचा वीजपुरवठा होत असतो. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास व्हेरॉक कंपनीचे व्यवस्थापक श्री. मिश्रा हे मेघा इलेक्ट्रिकल्स या खासगी कंपनीच्या तीन इलेक्ट्रिशियनला घेऊन महावितरणच्या उपकेंद्रात गेले होते. तेथे उपकेंद्रातील मीटरचे झाकण काढून बाजूला ठेवल्यानंतर मिश्रा यांनी इन्ड्युरन्स कंपनीचा वीजपुरवठा सुरू असलेल्या वाय फेजचा इन्सुलेशन टेप काढण्याचा प्रयत्न केला.

कुख्यात गुन्हेगाराची टोळक्याने केली हत्या ! औरंगाबादेतील घटना.  

टेप काढताना विजेचा शॉक लागल्यामुळे मिश्रा व त्यांच्या सोबत असलेलेले मेघा इलेक्ट्रिशियन या खासगी कंपनीचे सपन प्रकाश मुखर्जी (वय ३६), जगदीश सुधाकर बोराडे (३०) आणि योगेश सुधाकर बोराडे (२८ सर्व रा.बजाजनगर) हे चारजण भाजले. विजेचा उच्चदाब असल्यामुळे शॉक लागल्यानंतर मुखर्जी यांच्या तोंड, दोन्ही हात आणि डोळ्यांना गंभीर इजा झाली आहे. जखमीपैकी जगदीश व योगेश हे भाऊ आहेत. या चौघांवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कंपनीच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा नोंद
या अपघातानंतर इन्ड्युरन्स कंपनीचा सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहिला. त्यामुळे महावितरणचे जवळपास एक लाख १६ हजार ६९५ रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी महावितरणचे सहायक अभियंता जितेंद्र भालेराव मालुसरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून व्हेरॉकचे व्यवस्थापक मिश्रा यांच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four Men Burned In Electricity Shock Aurangabad News