शुक्रवारची नमाज घरीच अदा करा

शेखलाल शेख
Thursday, 26 March 2020

मशीदीत फक्त इमाम व मोज्जन नमाज अदा करतील, असे आवाहन इमारते शरियाचे मराठवाडा उपाध्यक्ष मौलाना डॉ. अब्दुल रशीद मदनी यांनी केले.

औरंगाबादः जुमाची नमाज शुक्रवारी (ता.२६) सर्वांनी घरीच अदा करावी, सर्वांसाठी दुआ करावी. मशीदीत फक्त इमाम व मोज्जन नमाज अदा करतील, असे आवाहन इमारते शरियाचे मराठवाडा उपाध्यक्ष मौलाना डॉ. अब्दुल रशीद मदनी यांनी केले. हा निर्णय उलेमांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

सध्या संचारबंदी जाहिर झालेली असून केंद्र सरकारने सुद्धा लॉकडाउन जाहिर केले आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या सूचनांचे पालन करावे. संकटाचा सामना करण्यासाठी सर्व नागरिकांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वाचा अवलंब करत मानवजातीच्या हितासाठी आपल्या घरी नमाज अदा करावी. शासन आणि मशीद कमिटीला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. 

सर्वसामान्यांना मशीदीत येण्यास मनाई

राज्यात कोरोनाचा व्हायरसचा फैलाव तसेच राज्य व सरकारतर्फे संचारबंदी जाहीर झाली आहे. त्यामुळे शहरातील सर्व मशिदीत सर्वसामान्यांना नमाजासाठी मनाई करण्यात आली आहे. इमारते शरियासह विविध उलेमांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मशिदीत आता फक्त इमाम आणि मोज्जन हेच राहतील. बैठकीत शासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहनसुद्धा करण्यात आले. 

हेही वाचा- मंत्री भुमरे, सत्तार सुरक्षा वाहन सोडणार

खासदार इम्तियाज जलील यांच्या घरी झालेल्या बैठकीत फर्ज नमाद अदा करण्याचा निर्णय झाला होता; मात्र राज्यात कोरोनाचा वाढता फैलाव, २१ दिवसांचे लॉकडाऊन यामध्ये आता इमारते शरियांनी पुन्हा बैठक घेऊन सर्व मशिदीत सर्वसामान्यांना नमाजसाठी मनाई केली आहे. सर्वांना त्यांच्या घरातच पाच वेळची नमाज अदा करावी, कुणीही आवश्‍यकता नसेल तर घराबाहेर पडू नये. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहनसुद्धा नागरिकांना करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Friday Namaz in Marathwada Aurangabad News