esakal | गणेश मूर्ती काही दिवस अगोदरच नागरिकांनी खरेदी कराव्या
sakal

बोलून बातमी शोधा

गणेश मूर्ती काही दिवस अगोदरच नागरिकांनी खरेदी कराव्या

गणेशोत्सव काळात नागरिकांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. गणेश मूर्ती काही दिवस अगोदरच नागरिकांनी खरेदी करावी. नागरिकांनी प्रशासनाच्या उपाययोजनांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले.

गणेश मूर्ती काही दिवस अगोदरच नागरिकांनी खरेदी कराव्या

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबादः गणेशोत्सव काळात नागरिकांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. गणेश मूर्ती काही दिवस अगोदरच नागरिकांनी खरेदी करावी. नागरिकांनी प्रशासनाच्या उपाययोजनांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले. बदली आदेश निघण्याअगोदर त्‍यांनी बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत खासदार इम्तियाज जलिल, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अंबादास दानवे, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, आमदार प्रदीप जैस्वाल, महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांची उपस्थिती होती. 

कोण काय म्हणाले... 

जिल्हाधिकारीः गणेशमूर्तींची विक्री टीव्ही सेंटर, मुकुंदवाडी, जिल्हा परिषद मैदान येथे होते. या ठिकाणांत अधिकाधिक वाढ करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. शहरातील व्यापाऱ्यांप्रमाणे ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांचीदेखील चाचणी करण्यात येईल. शिवाय ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांचा तत्काळ शोध घेणे, त्यांवर लागलीच उपचार सुरू करणे या दृष्टीने ग्रामसुरक्षा दलाची मदत घेण्यात येईल. कोरोना नियंत्रणासाठी तालुकानिहाय स्वतंत्ररित्या उपजिल्हाधिकारी यांची नेमणूक केली आहे. असे जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले.

आयुक्त तथा प्रशासकः शहरात ८० टक्के रुग्णांना आता गृह विलगीकरणाची सुविधा देण्यात येत आहे. परंतु सुविधा नसलेल्यांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात येत आहे. कोरोना अधिक नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांचे सहकार्य हवे असे आवाहन महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी केले. 

पोलिस आयुक्तः दहीहंडी उत्सव आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलिस बंदोबस्त, कोरोनाच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांबाबत लोकप्रतिनिधींना पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सविस्तर माहिती दिली. 

डॉ. भागवत कराडः कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रयत्न करावेत. सध्या कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी गाफील राहून चालणार नाही.

इम्तियाज जलीलः जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट काही अटी शर्तींसह सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी. 

हरिभाऊ बागडेः  नागरिकांमध्ये कटाक्षाने मास्क वापरणे, शारिरिक अंतर बाळगणे याबाबत जनजागृती करण्यात यावी. गणेशमूर्तींच्या स्टॉलला लवकर परवानगी द्यावी, जेणेकरून शेवटच्या दिवशी होणारी गर्दी टाळता येईल. 
अतुल सावेः विदेशातून आलेल्या नागरिकांना त्यांच्या घरातच क्वारंटाइन करण्याची मुभा असावी.

प्रदीप जैस्वालः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी सार्वजनिक दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार नाही.

अंबादास दानवेः ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. पण तुलनेत कोरोना नियंत्रणात आहे. सिल्लोड आणि गंगापूर तालुक्यात मृत्यू रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत, असेच प्रयत्न इतर तालुक्यांतही गरजेचे.