घाटीतील तीन इमारतींच्या वीज जोडणीचा मार्ग मोकळा 

योगेश पायघन
Thursday, 2 January 2020

कर्मचारी निवासस्थानांवर असलेल्या 47.89 लाखांच्या थकबाकीमुळे सुरवातीला डेंटलच्या वसतिगृहालाही महावितरणने वीजजोडणी दिली नव्हती; मात्र डेंटल आणि घाटी वेगवेगळ्या संस्था आहेत, हे पटवून देऊन सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर वीज जोडणी मिळाली; पण घाटीच्या नव्या इमारतींना थकबाकी भरल्याशिवाय जोडणी देणार नसल्याची भूमिका महावितरणने घेतली होती

औरंगाबाद : घाटी परिसरातील कर्मचारी निवासस्थानांच्या 47.89 लाखांच्या थकबाकीमुळे वीज जोडणी द्यायला स्पष्ट नकार दिला होता. घाटी प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे महावितरणने एकत्रित थकबाकीची तडजोड करत घाटीच्या थकबाकीतील 11.33 लाखांची व्याज माफ केले.

दरम्यान, उर्वरित थकीत 36 लाख 55 हजार 340 रुपये भरण्यास वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी बुधवारी (ता. एक) परवानगी दिली. त्यामुळे सुपरस्पेशालिटी विंगसह मध्यवर्ती ग्रंथालय व पदव्युत्तर विद्यार्थी वसतिगृहाच्या वीज जोडणीचा मार्ग मोकळा झाल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.

कर्मचारी निवासस्थानांवर असलेल्या 47.89 लाखांच्या थकबाकीमुळे सुरवातीला डेंटलच्या वसतिगृहालाही महावितरणने वीजजोडणी दिली नव्हती; मात्र डेंटल आणि घाटी वेगवेगळ्या संस्था आहेत, हे पटवून देऊन सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर वीज जोडणी मिळाली; पण घाटीच्या नव्या इमारतींना थकबाकी भरल्याशिवाय जोडणी देणार नसल्याची भूमिका महावितरणने घेतली होती.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने न्युरोसर्जरी, न्युरोलॉजी, कार्डियालॉजी, नेफ्रोलॉजी, युरोलॉजी, बर्न, प्लॅस्टिक सर्जरी, न्युओनेटॉलॉजी या आठ प्रकारच्या सेवा देण्यासाठी 248 खाटांच्या उभारलेल्या सुपरस्पेशालिटी इमारतीला डिसेंबरअखेर कार्यान्वित करण्याची तयारी ठेवण्याचे निर्देश दिल्याने अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी वीजजोडणीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले होते. 

सुपरस्पेशालिटी विंग, पीजी 
होस्टेल, ग्रंथालयाचा प्रश्‍न मार्गी

दरम्यान, उपअधिष्ठाता डॉ. सुधीर चौधरी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी जनार्दन राठोड हे महावितरणच्या अधिकाऱ्यांना तत्काळ वीजजोडणीसाठी प्रयत्न करीत होते. त्याला यश मिळाले. शिवाय डीएमईआरचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनीही थकबाकीची रक्काम 2019-20 च्या घाटीला मिळालेल्या वीज व पाण्याच्या देयकांच्या बजेटमधून भागवण्याला मान्यता दिली. 

सबस्टेशनच्या कामाला गती

सुपरस्पेशालिटी स्वतंत्र ब्लॉकसाठी सबस्टेशनची गरज आहे. त्यासाठी दोन कोटी 35 लाखांच्या निधीसाठी कार्यारंभ आदेश मिळालेला आहे. हा निधी बीडीएसवर लवकरच उपलब्ध होईल व सबस्टेशनचे काम सुरू होईल. सबस्टेशनचे काम पूर्ण होण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे डॉ. येळीकर म्हणाल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gmch Ghati hospital Aurangabad news