जवान मदतीला धावले म्हणून रस्त्यात प्रसूती टळली 

योगेश पायघन
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

घाटी रुग्णालयात तिन्ही लिफ्ट बंद : स्ट्रेचर उचलून पायऱ्यांवरून गाठले प्रसूतिगृह

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात सर्जिकल इमारतीच्या तीनही लिफ्ट बंद असल्याने प्रसूतीसाठी दाखल महिलेला अडचणींचा सामना करावा लागला. वेळीच महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी महिलेला उचलून पायऱ्यांवरून दुसऱ्या मजल्यावरील प्रसूतिगृहात पोचवले. त्यामुळे अनर्थ टळला. या घटनेवरून घाटी प्रशासनाचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल सचिन भालेराव (वय 28, हर्सूल) अपघात विभागात प्रसूतीसाठी रात्री साडेदहाच्या सुमारास दाखल झाल्या. त्यांना नातेवाईक प्रसूतिगृहात घेऊन जात होते. त्यावेळी पहिल्या क्रमांकाच्या लिफ्टजवळ महिलेला कळा सुरू झाल्या. पुढच्या दोन व तीन नंबरच्या लिफ्टही बंद होत्या. लिफ्टजवळही कुणी नव्हते. उशीर होत असल्याने महिला विव्हळत होती.

वाचा ः वीर्यदानानेही गर्भधारणा होत नाही... हा आहे पर्याय

धावाधाव व गोंधळ एमएसएफ जवानांच्या लक्षात आल्यावर त्यांनी धाव घेतली. श्‍यामकांत देशमुख, विठ्ठल दहिफळे, अर्जुन आडे, किरण साळुंके, पांडुरंग मैद या जवानांनी स्ट्रेचरच्या वरील भाग उचलून महिलेला पायऱ्यांवरून दुसऱ्या मजल्यावर असलेल्या प्रसूतिगृहात सुखरूप पोचवले. त्यानंतर महिलेची काही वेळातच प्रसूती झाली. जवानांनी वेळीच मदत करून पोचवले नसते तर प्रसूती पायऱ्यांवरच झाली असती असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तर चांगल्या कामाबद्दल एमएसएफचे कौतुक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्याचे जवान म्हणाले. 

याच ठिकाणी फरशीवर बाळ पडून दगावले होते

घाटीत प्रसूतीसाठी आलेली महिला वॉर्डमध्ये नेत असताना बंद लिफ्टसमोर व्हरांड्यातच प्रसूत झाली; मात्र या घटनेत बाळ दगावल्याची घटना 21 जानेवारी 2019 च्या मध्यरात्री घडली होती. त्यानंतर लिफ्ट सुरू करण्यात आली होती. मात्र, रात्रीचे लिफ्ट बंद असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला. 

प्रसूतिगृहाची वाट कधी होईल सुकर? 

जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभागाची 14 शासकीय रुग्णालयांत वर्षभरात आठ हजार प्रसूती होतात. तर महापालिकेच्या पाचपैकी तीन रुग्णालयांत वर्षाकाठी मोठ्या मुश्‍किलीने हजारेक प्रसूती होतात. तर छावणीसह राज्य कामगार विमा रुग्णालयांत आठशे ते हजार प्रसूती होत आहेत. म्हणजे जिल्ह्यातील इतर सर्व शासकीय रुग्णालय मिळून दहा हजार सरासरी प्रसूती वर्षाकाठी होतात.

तर एकट्या घाटीचा प्रसूती विभाग 18 हजार नॉर्मल तर चार हजार सिझेरियन प्रसूतीचे दिव्य उचलतो. शिवाय नवजात शिशू विभागात गुणवत्तेच्या वाढीचा प्रकल्प राबवून देशात नाव कमवत आहे. मात्र, केवळ अपघात विभाग ते स्त्रीरोगसह विविध विभागात जाण्यापर्यंतचे दिव्य कोण उचलेल याचा पेच प्रशासन सोडवत नसल्याने चांगले काम करणाऱ्या विभागांच्या कामावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gmch Ghati hospital Aurangabad news