esakal | वीर्य दान घेऊनही गर्भ राहत नसेल, तर काय कराल.... वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Medical News

शारीरिकदृष्ट्या निरोगी दिसणाऱ्या महिलांच्याही गर्भाशयात बीजांडांची निर्मिती न झाल्याने गर्भधारणेत अडथळे येतात. बऱ्याच प्रयत्नांनंतर जेव्हा गर्भधारणा होत नाही, तेव्हा विनाकरण त्या महिलेला "वांझ' ठरवले जाते.

वीर्य दान घेऊनही गर्भ राहत नसेल, तर काय कराल.... वाचा

sakal_logo
By
योगेश पायघन

औरंगाबाद : नैसर्गिकरीत्या गर्भधारणा न झाल्यास कृत्रिम गर्भधारणा तंत्र उपयोगी आणता येते; मात्र अनेकदा महिलेच्या गर्भात बीजांड निर्मिती होत नसल्यास ते तंत्रही अयशस्वी होते. अशा परिस्थितीत बीजांड दानातून गर्भधारणा होऊ शकते, असे स्त्रीरोग व आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. धोंडीराम भारती यांनी "सकाळ'ला सांगितले. 

शारीरिकदृष्ट्या निरोगी दिसणाऱ्या महिलांच्याही गर्भाशयात बीजांडांची निर्मिती न झाल्याने गर्भधारणेत अडथळे येतात. बऱ्याच प्रयत्नांनंतर जेव्हा गर्भधारणा होत नाही, तेव्हा विनाकरण त्या महिलेला "वांझ' ठरवले जाते. वंध्यत्वामुळे पती-पत्नीच्या नात्यात अंतर निर्माण होऊ लागते किंवा कौटुंबिक संबंधांत तणाव निर्माण होतो. 

महिलांची गर्भधारणा न होऊ शकणे किंवा गर्भधारणेनंतर ती प्रक्रिया प्रत्यक्ष बाळाच्या जन्मापर्यंत घेऊन न जाता येण्यामध्ये प्रामुख्याने या बीजांडांच्या गुणवत्तेची कमतरता कारणीभूत ठरते, असेही डॉ. भारती म्हणाले.

गर्भधारणेत बीजांडांचे महत्त्व 

सामान्य गर्भधारणेत महिलेच्या मासिक पाळीपासून तिच्या अंडाशयात बीजांडे निर्माण व्हायला सुरवात होते. यातील एक बीजांड परिपक्व होऊन फेलोपियन ट्यूबमध्ये येते. दरम्यान, शरीरसंबंध झाल्यास शुक्राणू या बीजांडाचे फलन करतो आणि भ्रूण तयार होते. 

वाचा - या कारणांनी खालावत आहे शुक्राणूंची गुणवत्ता

चार-पाच दिवस तिथेच विकसित झाल्यावर भ्रूण गर्भपिशवीत स्थिरावते आणि जवळपास नऊ महिन्यांपर्यंत बाळ विकसित होऊन जन्माला येते. महिलेच्या शरीरात तयार होणाऱ्या बीजांडांत काही विकार असेल, तर गर्भधारणा होऊ शकत नाही किंवा गर्भधारणा झाल्यावरही गर्भपात होण्याची भीती असते.

गर्भधारणेचा सुवर्ण काळ तिशीच्या आतच 

महिलेच्या अंडाशयात जन्मापासूनच बीजांडांची संख्या ठरलेली असते. मासिक पाळी सुरू झाल्याबरोबरच प्रत्येक महिन्यात हे बीजांड खर्च होत राहतात. एका वयानंतर ही बीजांडे संपून जातात आणि महिलेची रजोनिवृत्ती होते. 

क्लिक करा - घाटीत पुन्हा तोडफोड, डॉक्टरला...

22 ते 30 वर्षांच्या वयात दर महिन्यात गर्भधारणेची शक्‍यता सुमारे 22 ते 25 टक्के असते. तीच 35व्या वर्षांनंतर कमी होऊन 15 टक्के उरते; तर चाळीशीनंतर कमी होऊन 10 टक्‍क्‍यांपेक्षाही कमी होत जाते. 44 वर्षांनंतर ती चार टक्‍क्‍यांपेक्षाही कमी होऊन प्रजनन क्षमतेत घट होत असल्याचे संशोधन आणि अभ्यासातून समोर आल्याचे आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. पवन देवेंद्र यांनी सांगितले.

अशी आहे प्रक्रिया 

"डोनर एग'ची प्रक्रिया शासनाच्या एआरटी कायद्यांतर्गत येते. यात बीजांडे दान करणारी आणि घेणारी अशा दोन्ही महिलांची लेखी संमती घेतली जाते. तसेच दोघींची ओळख गुप्त ठेवली जाते. डोनर एग प्रक्रियेदरम्यान 21 ते 33 वर्षे वयाच्या स्वतःची मुले असून, प्रजनन क्षमता चांगली असलेल्या महिलेची निवड केली जाते. त्या महिलांना हार्मोनचे इंजेक्‍शन देऊन बीजांडे तयार केली जातात. 

हेही वाचा - मनोरुग्णांना इथे मिळणार पूर्ण उपचार

दरम्यान, काही चाचण्यांच्या माध्यमातून तिच्या बीजांड निर्मितीवर लक्ष ठेवले जाते. ओव्हम पिकअप प्रक्रियेने त्या महिलेच्या शरीरातून बीजांडे, दान घेणाऱ्या महिलेच्या पतीच्या वीर्यातील शुक्राणूही प्रयोगशाळे संतुलित वातावरणात घेतले जातात. 

लॅबमध्ये "डोनर एग'सोबत शुक्राणूचे फलन केले जाते. ज्यामुळे भ्रूण तयार होते. तीन ते चार दिवस प्रयोगशाळेत विकसित झाल्यावर ते भ्रूण महिलेच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केले जाते. त्यानंतर भ्रूण महिलेच्या गर्भातच विकसित होऊन बाळ जन्म घेते.