पालकमंत्री देसाई यांच्या दौऱ्यापूर्वीच मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासमोर आंदोलनाच्या तयारीत असलेल्या सहा पदाधिकाऱ्यांना गुरुवारी (ता.२९) सकाळी पुंडलिकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले.

औरंगाबाद : मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही कायम असल्याने राज्यभरात मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. आरक्षणाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी सरकारविरोधात दंड थोपटून मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. शहराच्या दौऱ्यावर असलेले उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासमोर आंदोलनाच्या तयारीत असलेल्या सहा पदाधिकाऱ्यांना गुरुवारी (ता.२९) सकाळी पुंडलिकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले.

Corona Update : औरंगाबादेत १३३ जण कोरोनाबाधित, एकूण रुग्णसंख्या ३७ हजारांपुढे

रमेश केरे पाटील, रवींद्र काळे पाटील, शैलेश दिघे, ज्ञानेश्वर गायकवाड आणि झिरपे पाटील अशी या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले की, यातील केरे पाटील आणि काळे पाटील यांना ताब्यात घेऊन अन्य पदाधिकाऱ्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. पालकमंत्री देसाई शहरात असल्याने हे सर्वजण आंदोलनाच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आल्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोनवणे यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.

रस्ते कामाचे भूमिपूजन
वरद गणेश मंदिर ते लक्ष्मण चावडीपर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, प्रशासक अस्तिककुमार पांडेय, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, शहर अभियंता सखाराम पानझडे उपस्थित होते.

‘लव औरंगाबाद’ मोहिमेचा प्रारंभ
शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यासाठी ‘लव औरंगाबाद’ मोहिमेचा प्रारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते सिडको बस स्थानकाजवळ करण्यात आला. यावेळी खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे आदींची उपस्थिती होती.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Before Gurdian Minister Subhash Desai's Tour Marath Kranti Morcha's Office Bearers Take Remand