esakal | औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

He Spent 7 Hours In Tigers Cage

औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यान-प्राणिसंग्रहालयातील प्रकार; रात्रभर मुक्काम 

औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान-प्राणिसंग्रहालयात एकाने रात्रभर वाघाच्या पिंजऱ्यात मुक्काम केल्याचा खळबळजनक प्रकार गुरुवारी (ता. चार) समोर आला आहे. प्राणिसंग्रहालयाच्या पाठीमागील भिंतीवरून सोमवारी (ता. एक) रात्री त्याने उडी मारली अन् तो वाघाच्या पिंजऱ्यात पडला. मात्र, त्याचे नशीब बलवत्तर होते. यावेळी वाघ आतल्या पिंजऱ्यात होते. दरम्यान, या पिंजऱ्यातून बाहेर पडण्यास जागा नसल्याने रात्रभर तो त्याच ठिकाणी झोपून राहिला. सकाळी सुरक्षारक्षकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकाराने प्राणिसंग्रहालयाच्या सुरक्षेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

सूत्रांनी सांगितले की, प्राणिसंग्रहालयाच्या पाठीमागील भिंत कमकुवत आहे. या भिंतीवरून एकाने सोमवारी मध्यरात्री उडी मारली व तो थेट पिवळ्या वाघाच्या पिंजऱ्यात (सर्व्हीस एरिया) पडला. ही जागा बंदीस्त असून, वाघांच्या फिरण्यासाठीची आहे. मात्र, रात्रीच्यावेळी वाघ आतल्या पिंजऱ्यात ठेवले जातात. त्यामुळे तो वाचला. या पिंजऱ्याला लागूनच खंदक आहेत. त्यामुळे या पिंजऱ्यातून बाहेर पडणे शक्य नसल्यामुळे तो तेथेच थांबला.

हा प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी सात-साडेसातच्या सुमारास प्राणिसंग्रहालयातील सुरक्षारक्षकांच्या लक्षात आली. त्यांनी वरिष्ठांना माहिती कळविली. वरिष्ठांच्या आदेशानुसार क्रांतीचौक पोलिसांना बोलावून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, तोपर्यंत तब्बल सात तास तो वाघांच्या पिंजऱ्यात होता. 
 
यापूर्वीही घडली होती घटना 
प्राणिसंग्रहालयातील वाघांच्या पिंजऱ्यासमोर असलेल्या खंदकात एकाने यापूर्वी उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर एक जण तब्बल सात तास वाघाच्या पिंजऱ्यात मुक्काम केल्याचा प्रकार समोर आल्याने सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. संग्रहालयात प्रवेशव्दाराच्या बाजूने कडेकोट बंदोबस्त आहे. मात्र, पाठीमागच्या बाजूने सर्व आलबेल आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षकाची नजर चुकवून कुणीही प्राणिसंग्रहालयात येऊ शकते, फेरफटका मारून बाहेर जाऊ शकते. भिंतीवरून किंवा नाल्याच्या काठानेदेखील प्राणिसंग्रहालयात येण्यासाठी जागा आहे. त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. 

बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई पण नेमकी काय? कृषी विभागसमोरील आव्हान कायम
 

पोलिसांच्या दिले ताब्यात 
या संदर्भात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात पशूधन परिवेक्षक शेख शाहेद शेख निजाम यांनी माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, एक अनोळखी व्यक्ती दोन जूनच्या सकाळी वाघाच्या पिंजऱ्याच्या जाळी काढून आत आल्याचे दिसून आले. त्याला महापालिकेने पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याचे नाव रवींद्र मधुकर ससाणे असून, तो श्रीकृष्णनगर पिसादेवी येथील रहिवासी आहे. तो मनोरुग्ण आहे. घाटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्याकडे त्याच्या वडिलांचा फोन नंबर होता. त्यावरून संपर्क करून त्याच्या वडिलांना बोलावून घेतले व त्याला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.  

go to top