अर्ध्या तासात औरंगाबाद शहरात जोरदार पाऊस, नाल्यांना पूर, रस्त्यांवर तळे

Rain Hit Aurangabad
Rain Hit Aurangabad

औरंगाबाद : शहर व परिसरात पावसाचा जोर कायम असून, सोमवारी (ता. २१) दुपारी मुसळधार पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले. विजेच्या कडकडाटासह काही भागांत अर्धा तास, तर काही भागांत तासभर जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसाने नाल्यांना पूर आला व काठावरील घरांमध्ये पाणी शिरले.

रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागली. उल्कानगरी भागात झाड कोसळले, तर सातारा गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती. पावसाची चिकलठाणा वेधशाळेत ५७.६ मिलिमीटर नोंद झाली आहे. शहर परिसरात सातत्याने पाऊस होत आहे. रविवारी (ता. २०) पावसाने उसंत घेतली होती. मात्र सोमवारी कसर भरून काढली. दुपारी साडेतीन वाजेनंतर आकाशात ढग भरून आले व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरवात झाली.

पावसाचा जोर एवढा होता की, अवघ्या अर्ध्या तासात शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले. गुडघाभर पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागली. काहींनी मिळेल तिथे आसरा घेतला. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षित अंतर पाळण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र पावसामुळे पेट्रोलपंप, उड्डाणपुलांच्या खाली मोठी गर्दी झाली. ही गर्दी पाहून काहीजण भिजतच घरी गेले.

काही भागांत अर्ध्या तासात पावसाचा जोर कमी झाला तर काही ठिकाणी तासभर पावसाची धार सुरूच होती. जोरदार पाऊस आणि वादळामुळे उल्कानगरीतील अग्निहोत्र परिसरात झाड उन्मळून पडल्याची घटना घडली आहे. याच भागातील राजनगरमधील महापालिकेच्या दवाखान्यातील तळघरात पाणी शिरले. घोगरे निवासस्थान परिसरातील बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले. गादिया विहारमधील शिवराज कॉलनीत अग्निशमन दलाच्या जवानांनी पंपिंग करून पाणी उपसले.


या भागात उडाली तारांबळ
शहराच्या सखल भागांत पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या दुकानदारांना साहित्य वाचविण्यासाठी धावपळ करावी लागली. पावसाने मुकुंदवाडी, जयभवानीनगर, पुंडलिकनगर, चिकलठाणा, सिडको-हडको, जटवाडा, हर्सूल, कांचनवाडी, ईटखेडा, गादिया विहार, नारेगाव, मिसारवाडी, ब्रिजवाडी, एमआयडीसी, समर्थनगर, बेगमपुरा, छावणी, नक्षत्रवाडी, भीमनगर-भावसिंगपुरा, नंदनवन कॉलनी, पडेगाव, मिटमिटा, तारांगण, पदमपुरा, रेल्वेस्टेशन, एकतानगर, विजय चौक, भारतनगर, ज्योतीनगर, सहकारनगर, टिळकनगर, गारखेडा भागात पाणी साचल्याने तारांबळ उडाली.

सातारा-देवळाईचे झाले तळे
सातारा-देवळाई भागातील नाल्याचे पाणी रस्त्यावर आले. अतिक्रमणांमुळे पाणी बाहेर पडण्याचे मार्ग बंद झाल्याने अनेक वसाहतींमध्ये गुडघाभर पाणी होते. हे पाणी अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले तर रस्त्यांचे तळे झाले होते. नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्याने देवळाई चौकात वाहतुकीची कोंडी झाली, तर सातारा गावाला जोडणारा पूल काही काळ पाण्याखाली गेला होता. या पावसाचा अलोकनगर, चंद्रशेखरनगर, ऊर्जानगर, छत्रपतीनगर, राजनगर, भाग्योदयनगर, मल्हारनगर, दिशा घरकुल, श्रीराम कॉलनी, अभिषेक रेसिडेन्सी, रामनगर, आयटीआय कॉलनी, संग्रामनगर, ठाकरेनगर, संघर्षनगर, प्रतापनगर, हरिसाई पार्क, हायकोर्ट कॉलनी, म्हाडा कॉलनी, वसंतविहार, चावडा कॉम्प्लेक्स, प्रल्हादनगरसह अनेक भागांना फटका बसला.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com