
पालकांनी आपल्या पाल्याचे कायदेशीर वय पूर्ण झाल्यावरच विवाह करण्याचे आवाहन गृहमंत्री देशमुख यांनी केले आहे.
शिऊर (जि.औरंगाबाद) : बालिका दिनाच्या दिवशीच शिऊर पोलिसांनी एक बालविवाह रोखला व दोन्ही कुटुंबातील नातेवाईकांचे समुपदेशन केले. शिऊर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या टीमने केलेल्या या कारवाईचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक करत शिऊर पोलिसांची प्रशंसा केली आहे.
पालकांनी आपल्या पाल्याचे कायदेशीर वय पूर्ण झाल्यावरच विवाह करण्याचे आवाहन गृहमंत्री देशमुख यांनी केले आहे. शिऊर पोलिस ठाण्याच्या काही अंतरावर एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची गुप्त माहिती शिऊर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांना मिळताच त्यांनी विवाहस्थळी सदर मुलीच्या कुटुंबियांचे समुपदेशन करून मुलीच्या वयाची खात्री करून बालिका दिनाच्या दिवशीच बालविवाह रोखला.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. दरम्यान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन शिऊर पोलिसांचे कौतुक केले आहे.
संपादन - गणेश पिटेकर