ऑनर किलिंग : प्रेयसीचा पिता, चुलत्याच्या हल्ल्यात प्रियकराच्या भावाचा खून

Aurangabad News
Aurangabad News

औरंगाबाद : मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याच्या रागातून मुलीच्या बापासह चुलत्याने प्रियकराचे आई-वडील व अल्पवयीन भावावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात अल्पवयीन भावाचा मृत्यू झाला असून, आई-वडील गंभीर जखमी आहेत.

ही घटना लाख खंडाळा (ता. वैजापूर) येथे शनिवारी (ता. चौदा) रात्रीच्या सुमारास घडली. रोहिदास छगन देवकर व देविदास छगन देवकर (रा. लाख खंडाळा) अशी दोघा संशयित आरोपींची नावे आहेत. भीमराज बाळासाहेब गायकवाड (वय १७, रा. लाख खंडाळा) असे हल्ल्यात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाख खंडाळा येथे बाळासाहेब गायकवाड हे पत्नी व दोन्ही मुलांसह शेतवस्तीवर राहतात. तीन दिवसांपूर्वी त्यांचा मोठा मुलगा अमोल गायकवाड हा कामासाठी चाललो म्हणून घरातून बाहेर पडला. मात्र, तो घरी परत न आल्याने त्यांनी परिसरात व नातेवाईकांकडे त्याचा शोध घेतला. तो मिळून न आल्याने त्यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांत कळविली. 

शेजारीच शेतवस्तीवर रोहिदास देवकर हासुद्धा त्याचा भाऊ व कुटुंबासह राहतो. काही दिवसांपासून त्याचीही मुलगी घरातून बेपत्ता असल्याची माहिती गायकवाड कुटुंबीयांना होती. शनिवारी रात्री आठच्या सुमारास बाळासाहेब गायकवाड व त्यांची पत्नी अलका हे दोघे घरासमोर बसलेले होते, तर लहान मुलगा भीमराज हा घरात झोपलेला होता. यावेळी त्या ठिकाणी रोहिदास देवकर व देविदास देवकर हे दोघे भाऊ आले. ‘तुम्ही इकडे कसे काय आलात?’ अशी विचारणा बाळासाहेब यांनी त्यांना केली. मात्र, काही समजण्याअगोदरच देवकर बंधूंनी बाळासाहेब यांच्यावर कोयता व तलवारीने हल्ला केला.

पत्नी अलका यांनी पतीला वाचविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावरही दोघांनी तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात पती-पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले. या अवस्थेत जीव वाचविण्यासाठी बाळासाहेब हे पत्नीसह त्यांचे मोठे भाऊ दादासाहेब गायकवाड यांच्या घराकडे पळाले. त्यांचा भाऊ व पुतण्यांनी त्यांना उपचारासाठी वैजापूर येथे रुग्णालयात आणले. 

दरम्यान, याचवेळी घरात झोपलेला त्यांचा लहान मुलगा भीमराज याचा देविदास व रोहिदास या दोघांनी खून केल्याचे त्यांना समजले. याप्रकरणी अलका बाळासाहेब गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देविदास छगन देवकर, रोहिदास छगन देवकर या दोघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात खुनासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेतील दोन्ही संशयित आरोपींना पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com