रुग्णवाहिका आली नाही, बाजेवर टाकून आणले मायलेकीचे मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

  • सिल्लोड तालुक्‍यातील डोंगरगावची घटना
  • पोलिसांच्या दिरंगाईमुळे नातेवाईक संतप्त 

सिल्लोड : सिल्लोड शहरास लागून असलेल्या डोंगरगाव (ता. सिल्लोड) येथे गावाशेजारी असलेल्या विहिरीतील पाण्यात बुडालेल्या आईसह मुलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

मृतदेह मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी रुग्णवाहिका मिळण्यासाठी फोन केला; परंतु रुग्णवाहिका वेळेत न पोचल्यामुळे नातेवाइकांनी गावापर्यंत मृतदेह आणला. घटनेचे गांभीर्य नसल्याचा ठपका आरोग्य विभागावर ठेवत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. 

पुलाची सेंट्रिंग कोसळली, लोखंडी सळ्या पडून पाच मजूर दबले

मायलेक बेपत्ता झाल्याची नोंद त्यांच्या नातेवाइकांनी रविवारी (ता. 16) ग्रामीण पोलिस ठाण्यात केली होती. मृतदेह सापडल्याची माहिती दिल्यानंतरही पोलिसांनी येण्यास मोठा विलंब केल्यामुळे मृतांच्या नातेवाइकांनी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात संताप व्यक्त केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी ठिय्या आंदोलना पवित्रा नातेवाइकांनी घेतल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. त्याचबरोबर मृतदेहांचे इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी करण्यात आली.

घाटी रुग्णालयात मोठा फ्रॉड - वाचा 

सिल्लोड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे, ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांनी मृतांच्या नातेवाइकांची समजूत काढीत इनकॅमेरा शवविच्छेदनासाठी दोन्ही मृतदेह औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठविले. वंदना रेऊबा बनकर (वय 30) त्यांची मुलगी भारती (वय सात) या दोघी शनिवारपासून (ता.15) बेपत्ता होत्या. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मृतांचे नातेवाईक या दोघींचा शोध घेत होते.

मराठा क्रांती मोर्चामुळे किती विकले गेले झेंडे- वाचा  

यादरम्यान डोंगरगावातील दहिगाव रस्त्यालगत असलेल्या मुनाफ कारभारी या शेतकऱ्याच्या विहिरीत या दोघींचे मृतदेह पाण्यावर तरंगताना गावातील एका ग्रामस्थाला सोमवारी (ता. 17) सकाळी सातच्या सुमारास आढळून आले. त्याने ही घटना गावातील ग्रामस्थांना; तसेच पोलिसांना सांगितली; मात्र पोलिसांनी घटनास्थळी येण्यास उशीर केला. मायलेक बेपत्ता असल्याची तक्रार करूनही तपासात दिरंगाई केल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी पोलिसांना धारेवर धरले. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

मृतांच्या नातेवाइकांचा घातपाताचा आरोप 

सदर घटना घातपात असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला असून, घटनेचा वरिष्ठ पातळीवरून तपास करण्याच्या मागणी करीत नातेवाइकांनी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली होती. "डोंगरगाव येथील घटनेनंतर मृतदेह घाटी रुग्णालयात आणण्यात आले आहेत. उत्तरीय तपासणी अहवालानंतर या प्रकरणातील ठोस माहिती समोर येईल,'' असे पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman Suicide With Daughter Dongargaon Sillod Aurangabad News