असे ओळखा नैसर्गिकरीत्या आणि कृत्रिमरीत्या पिकलेले आंबे

मधुकर कांबळे
Saturday, 16 May 2020

अस्सल आंबा कुठे मिळेल? अशाही परिस्थितीत मात्र बरेच शेतकरी स्वतः आंबा नैसर्गिकरीत्या पिकवितात आणि बाजारात येतात. 
 

औरंगाबाद : उन्हाळ्याच्या सुटीत मामाच्या गावाला जायचे झाडावरील शाखा (पाडाला पिकलेले) आंबे दगड मारून पाडायच्या आणि यथेच्छ ताव मारायचा; पण आता कोरोनामुळे मामाच्या गावाला जाणं दूरच. चांगला नैसर्गिकरीत्या पिकविलेला आंबा खायला मिळाला तरी खूप झाले म्हणायचे अशी वेळ आली आहे. 

कोकणातून हापूसची पेटी आली, केसर आंबा घरपोच मिळतोय; तसेच बाजारात जाऊन डझन किंवा किलोने आंबा घ्यायचा. घरी आणून कापून किंवा रस करून खायचे. कधी आंबा दिसायला आकर्षक, पिवळाधमक असतो. पेटीला दीड-दोन हजार रुपये मोजले जातात आणि पेटी उघडून खायला गेले, की बऱ्याच प्रमाणात आंबट, स्वाद नसणे असे प्रकार होतात. अशा परिस्थितीत मग अस्सल आंबा कुठे मिळेल? अशाही परिस्थितीत मात्र बरेच शेतकरी स्वतः आंबा नैसर्गिकरीत्या पिकवितात आणि बाजारात येतात. 
  
नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा कसा ओळखाल? 
आंबा लवकर बाजारात आणण्याच्या हव्यासापोटी कोवळी फळे उतरविली जातात. लवकर माल विकून नफा कमाविण्यासाठी व्यापारी ते कार्बाईडमध्ये पिकवून ग्राहकांच्या माथी मारतात. यासाठी नैसर्गिकरीत्या पिकविलेला आंबा कसा ओळखायचा हेही एक आव्हान असते. फळबागतज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे म्हणाले, की आंब्याच्या देठाभोवतालचा भाग (खांदे) वर
आलेला असावा किंवा देठाच्या बरोबर असलेले तरी असावा. असे आंबे झाडावर तयार झाल्यानंतरच काढलेले असतात; मात्र देठ वर व दोन्ही बाजूंनी उतार असल्यास मात्र असे आंबे कोवळेच काढलेले असून, नक्कीच खराब निघतील असे समजावे.

औरंगाबादेत१८ महिण्यांच्या बाळाला कोरोना  

दुसरा फरक म्हणजे नैसर्गिकरीत्या पिकविलेल्या आंब्यांना कार्बाईडने पिकविलेल्या आंब्यासारखा पिवळा चकचकीत आकर्षक रंग येत नाही. तो मळकट दिसतो. असा आंबा नाकाजवळ धरल्यास घमघमाट येतो. आंबा दाबला असता नरम वाटतो. घरामध्ये आंबे ठेवल्यास सर्वत्र आंब्याचा सुगंध दरवळतो. 

नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही... 
 
कृत्रिमरीत्या पिकविलेले कसे ओळखावे 
डॉ. कापसे यांनी सांगितले, की कृत्रिमरीत्या कार्बाईडमध्ये पिकविलेले आंबे दिसायला आकर्षक पिवळे दिसतात, त्याला दाबल्यानंतर सहजासहजी ते दबत नाहीत. कृत्रिमरीत्या पिकविलेला आंबा नाकाजवळ धरला तर त्याचा घमघमाट येण्याऐवजी उग्र वास येतो आणि स्वादिष्ट नसतात म्हणजे त्यात गोडवा आलेला नसतो, आंबट लागतात. रस केला तर त्यात साखर
टाकावी लागते. कार्बाईडने पिकविलेला आंबा स्लो पॉयझन आहे. 

घरीही पिकवू शकतो 
कृत्रिम आंबे खाणे टाळण्यासाठी दुसराही पर्याय आहे तो म्हणजे कच्चे आंबे आणून घरच्या घरी पिकविणे. डॉ. कापसे म्हणाले खात्रीशीर आंबा खायचा असेल तर थेट शेतकऱ्यांकडून किंवा बाजार समितीमधून हवा तेवढा कच्चा आंबा विकत आणावा. शहरी भागात गवतामध्ये किंवा उसाच्या पाचटामध्ये आंब्याची आडी लावणे (पिकायला ठेवणे) शक्य असेल तर तसे पिकवावे किंवा क्रेटमध्ये अथवा कागदी बॉक्समध्ये तीन थर आंबे ठेवावेत. प्रत्येक थराच्या मध्ये कागद ठेवावा. आंब्यातून इथिलिन गॅस निघतो. तेव्हा एका आंब्याचा गॅस दुसऱ्या आंब्याला लागतो आणि आंबा अतिशय चांगले नैसर्गिकरित्या पिकतात. याशिवाय दुसऱ्या प्रकारात आंबे पिकविण्यासाठी इथरेलचा वापरही फायदेशी ठरतो. प्रतिलिटर पाण्यात दीड एमएल
इथरेल टाकून त्यात दहा मिनिटे आंबे त्यात बुडवावे आणि नंतर ते पिकायला ठेवावेत. त्यात अतिशय चांगला गोडवा येतो. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How to Detect Carbide Free Mangoes