पाइपलाइन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया, बीड बायपासवरील प्रकार

माधव इतबारे
Tuesday, 13 October 2020

बीड बायपास रोडवर एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा प्रकार मंगळवारी (ता. १३) सकाळी घडली.

औरंगाबाद : बीड बायपास रोडवर एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा प्रकार मंगळवारी (ता. १३) सकाळी घडली. सुमारे तीस फुटांपर्यंत पाण्याचे फवारे उडून हे पाणी आजूबाजूच्या घरात व दुकानांत शिरल्याने नुकसान झाले. दुपारी १२ वाजेनंतर एमआयडीसीने दुरुस्तीचे काम हाती घेतल्याचे नागरिकांनी सांगितले.

चिकलठाणा एमआयडीसी भागाला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन बीड बायपास परिसरातून जाते. कमलनयन बजाज हॉस्पिटलजवळ या पाइपलाइनला काही दिवसांपासून गळती वाढली होती. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास अचानक पाइपलाइनमधून पाणी गळती वाढली व पाण्याचे फवारे सुमारे तीस फुटांपर्यंत उडाले. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले. शाहीद खान यांच्या घरासह इतरांच्या घरांमध्ये पाणीच पाणी झाले.

पर्यटननगरी औरंगाबादला खड्ड्यांचे ग्रहण, पर्यटक येणार कुठून?

त्यात संगणक, झेरॉक्स मशीन, लॅपटॉपसह घरगुती साहित्य भिजून नुकसान झाले. काही जणांच्या दुकानातही पाणी शिरल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याबाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना माहिती कळविण्यात आली. अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन पाणीपुरवठा बंद केला. मात्र दुपारी १२ वाजेपर्यंत पाणी वाहतच होते. पाण्याचा प्रवाह बंद झाल्यानंतर पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

पाइपलाइन तब्बल चाळीस वर्षांपूर्वीची
ही पाइपलाइन चाळीस वर्षांपूर्वीची जुनी आहे. ती बदलण्यासाठी प्रशासनाने अंदाजपत्रक तयार केले आहे; मात्र प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hundred Of Litters Water Wasted Aurangabad News