खैरे खासदार असते तर बस इलेक्‍ट्रिक असत्या!

माधव इतबारे
Thursday, 23 January 2020

महापौर नंदकुमार घाेडेले म्हणाले, की शहरात इलेक्‍ट्रिक बस सुरू करण्याचा विचार झाला. त्यानुसार केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला; परंतु कुठे माशी शिंकली माहिती नाही? हा प्रस्ताव रखडला. चंद्रकांत खैरे दिल्लीत खासदार म्हणून दिल्लीत असते तर कदाचित हा प्रस्ताव मार्गी लागला असता. 

औरंगाबाद- इलेक्‍ट्रिक बससाठी महापालिकेने दिल्लीला प्रस्ताव पाठविला होता. मात्र या प्रस्तावाचे पुढे काय झाले माहीत नाही. चंद्रकांत खैरे खासदार असते तर इलेक्‍ट्रिक बसचा प्रस्ताव मार्गी लागला असता, असा चिमटा महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी (ता. 23) खासदार इम्तियाज जलील यांना काढला. 
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या शहर बसला गुरुवारी वर्ष पूर्ण झाले. औरंगपुरा येथे आयोजित कार्यक्रमात महापौर बोलत होते. व्यासपीठावर खासदार इम्तियाज जलील, सभापती जयश्री कुलकर्णी, नगरसेवक सचिन खैरे, बबिता चावरिया, कीर्ती शिंदे, स्वाती नागरे, एमआयएमचे गटनेते गंगाधर ढगे, आयुक्त आस्तिककुमार पांडेय, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक अरुण सिया, प्रशांत भुसारी यांची उपस्थिती होती. पुढे महापौर म्हणाले, की शहरात इलेक्‍ट्रिक बस सुरू करण्याचा विचार झाला. त्यानुसार केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला; परंतु कुठे माशी शिंकली माहिती नाही? हा प्रस्ताव रखडला. खासदार चंद्रकांत खैरे दिल्लीत असते तर कदाचित हा प्रस्ताव मार्गी लागला असता, असा टोला त्यांनी लगावला. 26 जानेवारीपासून शहरातील पर्यटनस्थळांना पर्यटकांना जाता यावे, यासाठी बस सुरू करावी अशी सूचना महापौरांनी केली. 

हेही वाचा - चौघींच्या दादल्याने टाकले एकीच्या खात्यात 14 लाख अन..मग असं झालं 

राजकीय हस्तक्षेप कमी करा 
शहरातील प्रत्येक गोष्टीत राजकीय हस्तक्षेप होतो. तो कमी करणे आवश्‍यक आहे. आयुक्तांनी महापालिकेतील राजकीय हस्तक्षेप खपवून न घेता विकासात्मक कामे करावीत. शहर बससेवा चांगली आहे; परंतु शहर स्मार्ट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्‍यक आहे. इंदूर शहरातील प्रत्येक नागरिकाला आपले शहर सुंदर व्हावे असे वाटते. आपण सुद्धा माझे शहर सुंदर व्हावे, यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. रस्त्याची कामे चांगली होत नाहीत, म्हणूनच पालकमंत्र्यांनी पाहणीनंतर कारवाईही केली. विकासासाठी सर्वांसोबत राहणार अशी ग्वाही खासदारांनी दिली. 

हेही वाचा नाशिकच्या मुलीसोबतही झाला होता तो प्रकार!

आणखी 50 बस आणणार 
लवकरच 90 बस रस्त्यावर धावतील. आगामी वर्षभराच्या कालावधीत उर्वरित 50 बसची सेवा सुरू करण्यात येईल. कर्मचारी स्मार्ट झाल्याशिवाय सेवा स्मार्ट होणार नाही, त्यामुळे याकडे लक्ष देण्यात येईल. आणखी 50 बस सुरू करण्यासाठी प्रयत्न करू, असे आयुक्त म्हणाले. 

महापौरांना पेलवले नाही बसचे स्टिअरिंग 
महापौर नंदकुमार घोडेले यांनी शहर बसचे स्टिअरिंग हाती घेत राऊंड मारला. मात्र त्यांना बसचा भार पेलवला नाही. मैदानात असलेल्या लाकडी खांबाला बस धडकली. यानंतर महापौरांची हौस महागात पडल्याची चर्चा सुरू झाली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If Chandrakant Khaire was an MP, the city bus would be electric