चलो बीड... चलो जालना... चलो 

अनिल जमधडे
सोमवार, 23 मार्च 2020

खाजगी वाहनचालकांनी केली प्रवाशांची लुट 

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभुमिवर घरातून बाहेर पडूच नये असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे. शहरात जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. असे असतानाही वसंतराव नाईक चौक (सिडको बसस्थानक) काही खासगी वाहने आणि एलपीजी ऑटो रिक्षा धारकांचा तर्फे चलो बीड... चलो जालना.. अशा आरोळ्या देत वाढीव भाडे घेत सर्रास अवैध प्रवाशी वाहतुक सुरु करण्यात आली.

कोरोनाच्या अनुशंगाने संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण पसरले आहे. म्हणूनच भारतात आणि सर्वच राज्यातही विशेष काळजी घेण्यात येत आहे. माणसांनी माणसांचा कमीतकमी संपर्क ठेवावा, समूहाने एकत्र येऊ नये, दोन व्यक्तींनी अंतर ठेवावे, कोरोनाचा संसर्ग हा गुणाकाराप्रमाणे वाढणार असल्याने नागरिकांनी घराच्या बाहेर येऊ नये अशी शासनाची भूमिका आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

चलो बीड... जालना​

दिवसभरात दोन वेळा पत्रकार परिषद घेऊन शासन आपली भूमिका स्पष्ट करत आहे. असे असले तरीही सोमवारी (ता. २३) वसंतराव चौक (सिडको) येथुन बीड आणि जालना शहरासाठी सर्रास अवैध वाहतूक सुरू झाली. सकाळ पासून चलो बीड... चलो जालना अशा आरोळ्या ऐकू येत होत्या. येणाऱ्या प्रवाशांना हात धरून वाहनात बसविण्यात येत होते. खाजगी क्रुझर, कार आणि अँपे रिक्षांच्या माध्यमाने करमाड, बदनापूर, जालना अशी वाहतुक करण्यात होती. 

प्रवाशांची केली लुट

जालना तीनशे रुपये तर बीडसाठी चारशे -पाचशे रुपयांपर्यंत भाडे आकारणी करण्यात येत होती. विशेष म्हणजे एका वाहनात कोंबून बसवल्या नंतर मास्क लावावा किंवा रुमाल बांधावेत अशी फारशी काळजी कोणी घेत घेताना दिसत नव्हते. चौकामध्ये साधा पोलिसही या अवैध वाहतुकीला रोखू शकत नाही, अशी परिस्थिती दुपारी तीन वाजेपर्यंत होती. वाहतूक व्यवस्था बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे, हे जरी खरे असले तरीही वाहतूक करताना काळजी घेणे आवश्यक आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal traveler traffic News